आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते – changbhalanews
राजकिय

आ. पृथ्वीराज चव्हाण हाच एकमेव योग्य चेहरा : डॉ. इंद्रजित मोहिते

वडगाव हवेली येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ मोहिते गटाचा कार्यकर्ता मेळावा

चांगभलं ऑनलाइन | कराड, प्रतिनिधी
: विधानसभेत जाणारा माणूस हा कोणाचाही हस्तक नसावा. तो कोणाचा चापलुस नसावा. तो स्वतंत्र व स्वतः च्या बुध्दीने आपल्या मतदारसंघाचे विचार मांडण्याची क्षमता, वक्तृत्व व अभ्यासू असावा. याकरिता मला पृथ्वीराज बाबांपेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ उमेदवार दिसत नाही. कराड दक्षिणेचा खऱ्या अर्थाने उर्वरित विकास साधण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव योग्य चेहरा आहेत. असे मत भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले.

वडगाव हवेली (ता. कराड) येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. सर्जेराव थोरात अध्यक्षस्थानी होते. उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, रोहित पाटील, संभाजी काकडे, शिवराज मोहिते, जे. डी. मोरे, अधिकराव गरुड, सुभाषराव पाटील, मिनाक्षी जगताप, शिवाजीराव जाधव, संताजी थोरात, वैभव थोरात, संजय तडाखे, डॉ. सुधीर जगताप, माजी उपसरपंच जयवंतराव जगताप, संतोष जगताप, जे. जे. जगताप, संजय जगताप, पतंगराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते म्हणाले, देशात पैशाच्या ताकदीच्या जोरावर लोकशाहीचा अपमान केला जात आहे. अंबानी आणि अदानीसारख्या लोकांच्या प्रगतीसाठी तुम्हा – आम्हाला शेतकऱ्याला रसातळाला नेले आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अत्याचार करणाऱ्या लोकांना भाजप पाठीशी घालत आहे. यशवंतराव मोहिते आणि त्या काळातील धुरिणांनी हे राज्य बंधुता, समता आणि समानतेच्या बळावर चालवले. परंतु आताच्या स्थितीत केवळ वर्णभेद व जाती जातीत तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेणारी प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एका विशिष्ट परिस्थितीत अडकला आहे. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार घेवून पुढे चालणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीला आपण विजयी करावे.

ते म्हणाले, ही निवडणूक दोन भिन्न विचारांची आहे. राज्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक जिंकणे अनिवार्य झाले आहे. आपल्या महिला लाडकी बहिण आहेतच. पण त्या बहिणींवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या लोकांचा सन्मान भाजप का करत आहे. गेल्या दहा वर्षात महिलांचा मोठा अवमान केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. महिलांना भांडी देताय पण त्या खाली असणारा गॅस आणि त्यामध्ये अन्न शिजवले जाणारे अन्न किती महागले, याचा विचार आपण केला पाहिजे.

तसेच पुढे म्हणाले, साखर कारखाने ऊसदरात ३१०० रुपयेवर का गारठले आहेत. कृष्णेचे दिवाळीचे बील कुठे आहे? आम्ही नंदनवन केले व भगीरथ आहात म्हणता मग इरिगेशन योजना बंद का आहेत. योजनांसाठी शेतकऱ्यांच्या अंगावर असलेले कर्ज उतरले का? याचा विचार होवून तात्विक निवडणूकीत प्रत्येकाने विरोधकांच्या दारात जावून मते मागावीत. गटतट विसरून कामाला लागा.

यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाची वैचारिक नांगरट केली. तर विलासराव पाटील – उंडाळकर यांनी वाडी – वस्तीवर विकास पोहचवला. यातून कराडचा परिसर बदलला. मी मुख्यमंत्री असताना कराड व मतदारसंघात पायाभूत सुविधा उभ्या केल्या. यापुढील काळात राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

ते म्हणाले, ही निवडणूक विचारधारेची आहे. यशवंतराव मोहिते आणि विलासकाकांनी जो विचार जपला, तो पुढे नेवूया. जातीयवादी विचारांना थारा न देण्याचा या मतदारसंघाचा इतिहास आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत होईल.

डॉ. सुधीर जगताप म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्याचा विकास दर उंचावत होता. पण भाजपचे सरकार आल्यानंतर राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर मिळत नाही. यावेळी अधिकराव जगताप व प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली.

प्रताप जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. जे. जे. जगताप यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close