आता आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचाही शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा ठराव ; साखरेचा हमीभाव 38 अन् सोयाबीनला 7 हजार देण्याची मागणी – changbhalanews
राजकियशेतीवाडी

आता आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचाही शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा ठराव ; साखरेचा हमीभाव 38 अन् सोयाबीनला 7 हजार देण्याची मागणी

चांगभलं ऑनलाइन | पुणे प्रतिनिधी
भाजप महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारणीच्या आज पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचा ठराव करण्यात आला. साखरेचा हमीभाव 38 रुपये आणि सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित सात हजार रुपये व कापसाला दहा हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा रयत क्रांती संघटनेने राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेऊन तसा ठराविक केला आहे. त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे दिसत आहे.

रयत क्रांती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीस राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सध्या रयत क्रांती संघटनेच्या आणि पक्षाच्या सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आलेल्या असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आ. सदाभाऊ खोत यांचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आलेला असून दौऱ्या दरम्यान तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यात “प्रदेशाध्यक्ष” पदाची नेमणूक करण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर विचार मंथन करण्यासाठी भविष्यात कार्यकर्त्यांची “अभ्यास शिबिरे” आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला आघाडीकडून कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विधान परिषदेवर नुकतेच आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल रयत क्रांती संघटनेकडून आ. सदाभाऊ खोत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

बैठकीत झालेले महत्त्वाचे ठराव याप्रमाणे :-
१) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
२) साखरेचा हमीभाव 38 रुपये करण्यात यावा.
३) शासनाकडून सोयाबीनला उप्तादन खर्चावर आधारित ७ हजार आणि कापसाला १० हजार हमीभाव देण्यात यावा.
४) सन २०२३-२४ चा पिक विमा देण्यात यावा.
५) वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानातून तार कुंपण द्यावे.
६) महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (MREGS) शेतीची कामे घेण्यात यावीत.
७) शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेकडून तपासण्यात येणारे सिबिल (कर्ज पात्रता) रद्द करण्यात यावे.
८) कांद्यावरील निर्यात शुल्क काढण्यात यावे.
९) शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठावण्यात यावी.
१०) आवश्यकता नसताना शेतमाल आयात करू नये.
११)रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान देण्यात यावे.
१२) शेतात लागणारी शेती अवजारे, बी बियाणे, खत यावर लागणारी GST माफ करण्यात यावी.

विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांच्या विरोधात रयत क्रांती उतरणार मैदानात…सहा मतदार संघात तयारी….

महायुतीचा घटक पक्ष असलेली रयत क्रांती संघटना विधानसभा निवडणुकीत सहा मतदार संघातून उमेदवार देणारा असून तशी तयारी संघटनेने सुरू केली आहे. राज्यातील निलंगा, जि. (लातूर ), माढा ( जि. सोलापूर ), खेड (आळंदी जि. पुणे) , वरुड मोर्शी (जि. अमरावती ) , मेहकर (जि. बुलढाणा) अन वाळवा (जि. सांगली) हे सहा मतदार संघ “रयत क्रांती पक्ष” मोठ्या ताकदीने लढवणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close