भाजपच्या ‘आयुष्यमान भारत कार्ड’ नोंदणी शिबीरास नागरिकांचा प्रतिसाद
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करून आयुष्यमान भारत कार्ड घ्यावे, असे आवाहन भाजपचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी केले.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्यावतीने सोमवार पेठेत श्री उत्तरालक्ष्मी मंदिरात मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक सुहास जगताप बोलत होते.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते. तसेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च शासनाकडून उचलला जातो. या योजनेत कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो, असे सुहास जगताप यांनी सांगितले.
भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून सोमवार पेठेसह शहरातील सर्व प्रभागात या मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून या पूर्णपणे कॅशलेस योजनेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहनही माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी केले.
दरम्यान, या योजनेसाठी सोमवार पेठ प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.