चंद्रजीत पाटील सातारा जिल्ह्यातील पहिले डबल सुपर रॅन्डोनिअर्स
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दैनिक पुढारी कराडचे सहा. उपसंपादक चंद्रजीत पाटील यांनी ऑडेक्स क्लब पॅरिशिअन (पॅरिस) या आंतरराष्ट्रीय सायकल क्लबचे संलग्न असलेल्या ऑडेक्स क्लब इंडियाचे संलग्न सदस्य असलेल्या चिपळूण येथील सह्याद्री रॅन्डोनिअर्सकडून शनिवार, 17 फेब्रुवारी पहाटे 5 ते रविवार, 18 फेब्रुवारी रात्री 9 या 40 तास मर्यादा असलेल्या पाटण – कराड – तासगाव – नागज फाटा – सोलापूर ते अक्कलकोट आणि याच मार्गाने पुन्हा रिटर्न अशा 600 किलोमीटर बीआरएम (सायकलिंग)चे आयोजन केलं होतं.
या स्पर्धेत सहभागी होत चंद्रजीत पाटील यांनी हे 614 किलोमीटर अंतर 38 तास 36 मिनिटात पूर्ण करून दुसऱ्यांदा सुपर रॅन्डोनिअर्स (एसआर) होण्याचा बहुमान मिळविला आहे. अत्यंत खडतर आणि ऊन, उलटा वारा व शारीरिक क्षमतेची कस पाहणारी ही राईड शनिवारी पूर्ण दिवस, शनिवारी पूर्ण रात्र आणि रविवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत फिनीश करेपर्यंत चंद्रजीत पाटील एक मिनिटही झोपले नाहीत.
अत्यंत खडतर मानली जाणारी 600 किलोमीटर बीआरएम स्पर्धा चंद्रजीत यांनी पूर्ण करण्यासोबतच यापूर्वी 18 नोव्हेंबरला 300 किलोमीटर, 2 डिसेंबरला 400 किलोमीटर तर मागील महिन्यात 21 जानेवारी रोजी 200 किलोमीटर बीआरएम पूर्ण केली होती. या चारही बीआरएम पूर्ण करत चंद्रजीत पाटील हे सातारा जिल्ह्यातील दोनदा एसआर (सुपर रॅन्डोनिअर्स) किताब पटकावणारे पहिले सायकलिस्ट बनले आहेत. यापूर्वी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सातारा जिल्ह्यातील पहिले सुपर रॅन्डोनिअर्स (एसआर) होण्याचाही बहुमान चंद्रजीत पाटील यांनी मिळविला होता. या अभिमानास्पद व प्रेरणादायी कामगिरीबद्दल त्यांचे ‘चांगभलं समुहा’कडून मनःपूर्वक अभिनंदन….!
दरम्यान, या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रजीत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.