कराडच्या त्या स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू

कराड | प्रतिनिधी
कराड शहरातील मुजावर कॉलनीत 25 ऑक्टोंबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटाच्या घटनेत जखमी झालेल्या सुलताना मुल्ला (वय 33) या महिलेचा येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला.
कराड शहरात 25 ऑक्टोंबर रोजी शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेल्या स्फोटात परिसरातील पाच घरांचे व सहा दुचाकींचे नुकसान झाले होते. तसेच तीन घरातील सात जण जखमी झाले होते. स्फोटानंतर सातारा, पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला होता.
या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी, घरातील दोन लहान मुले व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर कराडच्या स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. यादरम्यान शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला (वय 33) यांचा कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.