कराड अर्बन बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा थाटात शुभारंभ – changbhalanews
Uncategorized

कराड अर्बन बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा थाटात शुभारंभ

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दि कराड अर्बन बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ गुरूपुष्यामृतच्या शुभमुहूर्तावर दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी एकाचवेळी कराड, पुणे, सातारा, सांगली अशा चार वेगवेगळ्या शहरांमधुन ग्राहक, सभासद संपर्क व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करून उत्साहात करण्यात आला‌.

बँकिंग क्षेत्रात १०७ वर्षांची अखंड विश्वासार्ह वाटचाल करीत असलेली आपली सर्वांची बँक दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतोय याचा खूप आनंद आणि अभिमान आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार सुलभ, सुरक्षित आणि अधिक वेगाने करू शकणार आहोत. या उद्घाटनाचा क्षण आपल्याला डिजीटल आर्थिक युगात आणखीन एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, असे मत बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी पुणे येथील ग्राहक मेळाव्यात व्यक्त केले.

मोबाईल बँकिंगमुळे आता कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आपण मोबाईलच्या साहाय्याने सहजपणे आर्थिक व्यवहार करू शकतो. आता बँकेच्या सभासदांनी, ग्राहकांनी नजीकच्या शाखेत समक्ष भेट देऊन मोबाईल बँकिंगची नोंदणी करून मोबाईल बँकिंग अॅपचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी कराड येथील ग्राहक मेळाव्यात बोलताना केले.

आर्थिक व्यवहार हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मोबाईल बँकिंग ही एक क्रांती आहे. यातून आपण आपल्या मोबाईलवरून एका क्लिकवर आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतो, खाती तपासणे, बिले भरणे, यांसारखे सर्व व्यवहार आता काही सेकंदातच पूर्ण करता येतील. असे बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी सातारा येथील ग्राहक मेळाव्यात म्हणाले.

मोबाईल बँकिंगची नवी सुरूवात ही आपल्या बँकेच्या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने मोठी क्रांती ठरेल. यापूर्वी बँकिंगसाठी कित्येकवेळा प्रत्यक्ष बँकेत जावे लागायचे, तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे मात्र मोबाईल बँकिंगमु‌ळे सर्व व्यवहार सोपे आणि वेळेची बचत करणारे होणार आहे. ही डिजीटल क्रांती केवळ आपल्या सोयीसाठी नाही, तर आपल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आहे, असे मत बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी सांगली येथील ग्राहक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

‘सकल जनांसी आधारू या बँकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच मोबाईल बँकिंग अॅपचे नाव ‘सकल पे’ असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या बँकेच्या शिरपेचात मोबाईल बँकिंगमुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे गौरवोदगारही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी काढले.

बँकेचे सप्टेंबर अखेर मोबाईल बँकिंग सुरू होईल, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते, त्याआधीच बँकेने मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण केल्याने लवकरच ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close