मराठा आरक्षणासाठी विजयनगरमध्ये निघाला कॅण्डल मार्च
कराड | प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि 50 टक्केच्या आतील टिकणारं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज (बुधवारी रात्री) कराडनजीकच्या विजयनगर गावात सकल मराठा समाजाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन लहान मुले आणि युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कॅन्डल मार्चला महावितरण कार्यालयाच्या शेजारील श्री गणेश मंदिरातून सुरुवात झाली. प्रारंभी श्री गणेशाची सामुदायिक आरती करण्यात आली. त्यानंतर मेणबत्त्या प्रज्वलित करून सर्व युवक-युवती, लहान मुले, महिला आणि पुरुष मंडळींनी त्या हातात घेतल्या. सकल मराठा समाजाचा बॅनर अग्रभागी होता. रिक्षावरील लाऊड स्पीकरवरून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे , एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात येत होत्या.
महावितरण कार्यालयापासून कराड पाटण रोडने काही अंतर पुढे गेल्यानंतर कॅन्डल मार्च गावात नेण्यात आला. गावातील मुख्य मार्गावरून फेरी काढण्यात आली. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, ‘कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा या फेरीत सहभागी झालेल्या युवक- युवतींच्याकडून देण्यात येत होत्या.
कॅन्डल मार्च गावातील श्री महाकाली मंदिरासमोर गेल्यानंतर सांगता झाली. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे, त्यांच्या उपोषणाची सरकारने तातडीने दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण मंजूर करावंं, शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील युवक युवतींना उत्तम गुणवत्ता असूनही पाठीमागे राहावे लागत आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे, त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे , अशी मागणी यावेळी करण्यात आली.