ठाकरे गटाचे सर्व जागांचे उमेदवार जाहीर ; दुसऱ्या यादीत चार जणांचा समावेश

चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने त्यांच्या वाट्याला आलेल्या लोकसभेच्या 22 जागांपैकी 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा यापूर्वीच जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत आणखी चार जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. दरम्यान, उत्तर मुंबई या एका जागेच्या उमेदवाराची घोषणा मित्र पक्षांसोबत चर्चा झाल्यानंतर करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या यादीत कल्याण मधून वैशाली दरेकर यांना, जळगाव येथून करण पवार यांना तर हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तसेच पालघर मधून भारती कामळी यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर केली आहे.
….राजू शेट्टींना पाठिंबा नाही…
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, किंवा त्यांनी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढावे, असे असा प्रस्ताव राजू शेट्टी यांना देण्यात आला होता. त्यासाठी दोन बैठका झाल्या, मात्र यावर एकमत होऊ शकलं नाही, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली जावी, अशी आग्रही मागणी होती. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातून पक्षाने सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत. ते आणि आम्ही एकाच शक्ती विरोधात लढत आहोत, राज्यघटना वाचवणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी जरी आमच्यावर टीका केली तरी मी स्वतःहून त्यांच्यावर टीका करणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांनाही मी तसे सांगितले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.