ब्रह्मदास पतसंस्थेचा साडे सत्तावीस कोटींचा व्यवसाय; २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
: – ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., बेलवडे बुद्रुक, ता. कराड या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.
संस्थेने चालू वर्षी साडे सत्तावीस कोटींचा एकत्रित व्यवसाय केला असून, संस्था तीस कोटींचा व्यवसायिक टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन, ज्येष्ठ नेते श्री. मारुती मोहिते होते. यावेळी माजी सरपंच पांडुरंग मोहिते, व्हाईस चेअरमन महादेव मोहिरे, ग्रामपंचायत सदस्य जयवंतराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत बोलताना संस्थापक वसंतराव मोहिते म्हणाले, संस्थेच्या २७ वर्षांच्या वाटचालीत संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, तसेच संस्थेचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना विनम्र सेवा देत दिलेल्या योगदानामुळे संस्थेने कराड तालुक्यासह जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवला आहे.
या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक, सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील यांनी दिली. सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
अहवाल वाचन करत संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना व्यवस्थापक उमेश पाटील म्हणाले, संस्थेच्या एकूण ठेवी १५ कोटी ६१ लाख रुपयांच्या आहेत, तर ११ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेला १४ लाख ६३ हजार रुपयांचा नफा झाला असून, संस्थेचा २७ कोटी ४९ लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद पाटणकर यांनी, जयवंतराव मोहिते यांनी आभार मानले. सभेस संस्थेच्या सर्व संचालकांसह, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.