काय सांगता ! चोरटे आले अन् मटण घेऊन गेले!!

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
उन्हाळ्याचे दिवस, त्यात जत्रायात्रांचा हंगाम… पै पाहुण्यांची वर्दळ… गावागावात असं वातावरण असताना कराड तालुक्यात यात्रा कालावधीतच भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गावच्या यात्रेच्या एक दिवस अगोदर रात्रीच्या सुमारास चोरटे गावात आले अन यात्रेला पै-पाहुण्यांच्या मेजवानीसाठी ठेवलेली शेळीच चोरट्यांनी चोरून नेली. ती सुद्धा जिवंत नव्हे तर मुंडी आणि पाय जागेवरच कापून ठेवून फक्त इतर सर्व मटण घेऊन चोरटे पसार झाले. आश्चर्य वाटेल पण हा प्रकार कराड तालुक्यातील सरहद्दीवरच्या एका छोट्या गावात घडल्याचं समोर आलं आहे.
कराड तालुक्यातील मालखेड असं या गावाचं नाव. अक्षय तृतीयेला मालखेडची यात्रा असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ती साजरी झाली. पण गावात झालेल्या चोरीमुळे ती गावकऱ्यांच्या आणि परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात राहिली आहे. यात्रेपूर्वी एक दिवस अगोदर मालखेड गावातून होवाळवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन ठिकाणी ही चोरी झाली.
चोरट्यांनी सुरुवातीला गावठाणालगत असलेले एक घर लक्ष्य केले. या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील झोपेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून आणि घरातील एक सुटकेस पळवली. मंगळसूत्र तोडल्यानंतर महिलेस जाग आली. तिने आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला. काही अंतर उसाच्या शेतातून पुढे गेल्यानंतर चोरट्यांनी सुटकेस फोडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त तेथेच फेकले आणि ते पसार झाले. काही वेळातच या घटनेची माहिती गावात समजली आणि ग्रामस्थांनी चोरट्यांचा शोध सुरू केला, मात्र ते सापडले नाहीत.
यादरम्यानच महामार्गकडेला असणाऱ्या होवाळवस्ती पासून थोड्या अंतरावरील जनावरांच्या शेडमध्ये बांधलेली शेळी चोरट्यांनी चोरून नेली. पण ही शेळी नेताना जिवंत नेली नाही , तर तेथेच शेडात वैरण तोडण्यासाठी ठेवलेला कोयता घेऊन, त्या कोयत्याने चोरट्यांनी शेळीची मुंडी कापली, पाय कापले. कापलेली मुंडी आणि पाय अन् कातडे तेथेच ठेवून उर्वरित सर्व मटण घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी जनावरांचे मालक चारा घालण्यासाठी शेडमध्ये आल्यानंतर त्यांना मुंडी, पाय व कातडे तेथेच ठेवून शेळीचे धड चोरट्यांनी गायब केले असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती सकाळी गावात समजताच एकच खळबळ उडाली. प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करू लागला. चोरट्यांनी शेळीचे मटण तर नेले पण मुंडी आणि पाय का कापून ठेवले? असा प्रश्न ज्याला त्याला पडला होता. चोरटे दोन होते की चार होते? स्थानिक होते की परप्रांतीय? अशा चोऱ्यांची पद्धत कोणाची असते वगैरे वगैरे चर्चा आणि तर्कवितर्क अद्याप सुरू आहेतच. या दोन्ही घटनांची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली नाही. त्यामुळे या चोऱ्यांचा अधिकचा तपशील समजू शकलेला नाही.
कडी काढण्यासाठी चोरट्यांची शक्कल….
चोरट्यांनी मंगळसूत्र आणि सुटकेस चोरून नेलेल्या घरात दरवाजाची कडी शेजारच्या खिडकीतून आत हात घालून काढली. त्यासाठी घराच्या बाहेर असलेल्या पेरूच्या झाडाची इंग्रजीतील ‘वाय’ आकाराची छोटी फांदी खुरप्याने तोडून घेतली होती. या फांदीच्या साह्याने चोरट्याने आत हात घालून आतील कडी आतून काढली आणि दरवाजा उघडला, असे सकाळी घर मालकाच्या निदर्शनास आले. पेरूच्या झाडाची वाय आकाराची फांदी चोरट्याने कडी काढण्यासाठी वापरल्याची आणि त्याव्दारे सहज कडी काढल्याची चर्चा गावात सुरू आहे.