आमिष दाखवून, तुरुंगवासाची भीती घालून भाजप सरकार चालवते
काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप ; कराडला इंडिया आघाडीचा मेळावा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देशासह राज्यात ईडी, सीबीआयची दहशत आहे. आमिष दाखवून, तुरुंगवासाची भीती घालून भाजपकडून सरकार चालवले जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर आता राम मंदिराच्या मुद्द्यावर मते वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला.
येथील हॉटेल पंकज लॉनमध्ये आयोजित इंडिया आघाडी सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, अजित पाटील-चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोना संकटातून उद्धव ठाकरेंनी राज्याला सावरले. पण 50 खोकेवाल्यांनी सरकार पाडले. हे पाप मिंदे गटाने करून महाराष्ट्राचा घात केला. परंतु, महाराष्ट्रावरील गद्दारीचा कलंक आता पुसायचा आहे. आता मते मागायला या; आम्ही दाखवतो, अशी लोकांची धारणा झाली आहे. देशासह राज्यात ईडी, सीबीआयची दहशत आहे. आमिष दाखवून, तुरुंगवासाची भीती घालून सरकार चालवले जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर आता राम मंदिराच्या मुद्द्यावर मते वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राम मंदिराचे भूमिपूजन एक इव्हेंट होता. निवडणूक लढवण्यासाठी मतांचे विभाजन करण्याचे काम सुरु आहे. मात्र, आता मतदार जागृत झाले आहेत. निर्यात बंदीने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी मोदींना धडा शिकवतील. वर्णव्यवस्था आणून नवी घटना बनवण्याचा भाजपचा मानस आहे. ही निवडणूक हरल्यास देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. आपल्याला यशवंत विचार जिवंत ठेवायचे आहेत.
खासदार श्रीनिवास पाटील बोलायला उभे राहताच पाऊस सुरु झाला. हा धागा पकडत ते म्हणाले, पावसाचे आणि माझे जुने समीकरण आहे. हा पाऊस क्रांती घडवणारा पाऊस आहे. सातारा जिल्ह्याने आतापर्यंत सात मुख्यमंत्री दिले आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हात, मशाल आणि तुतारी ही चिन्हे लोकांपर्यंत पोहचवून एकदिलाने निवडणूक लढवल्यास जय आपलाच आहे. त्या दृष्टीने प्रयत्नाला लागा.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात दडपशाही मार्गाने लोकशाही पायदळी तळवळण्याचे काम सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, यासाठी ही आघाडी आहे. मूळ कॉंग्रेसचा विचार पुढे नेला पाहिजे, ही भावना आहे. आता दडपशाही उलटून लावण्यासाठी सज्ज व्हा. येत्या काळात याहीपेक्षा मोठे संघटन करू. महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला आहे. ही लोकशाहीसाठी मारक बाब आहे.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, जातिव्यवस्था कायम राहावी, असे लोकसभेत एक जबाबदार मंत्री बोलतात. हे भयावह आहे. देशात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची राज्यव्यवस्था बदलण्याचे काम सुरू आहे. आता जर भाजपला हरवले नाही; तर पुन्हा निवडणुका होत नाहीत. जरी इंडिया आघाडी निवडून आली, तरी दिल्लीत बसलेली दोघे सत्ता सोडणार नाहीत. कारण त्यांना परिणामांची भीती आहे. त्यामुळे जनतेनेच आता दहशतीला न जुमानता बदल करायला हवा.
चांगला उमेदवार देऊ….
इंडिया आघाडीच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सर्वात चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. यादृष्टीने शरद पवार साहेबांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शरद पवार जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी आपण सर्वांना ताकतीने उभे राहायचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ….
मेळाव्यातील बॅनरवरून नाराज झालेल्या ओबीसी व अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.