भाजपकडे अवघी 30 टक्केच मते! महाराष्ट्रातील वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात , त्यामुळे अनापेक्षित निकाल येतील
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपकडे महाराष्ट्राचा विचार केला तर अवघी 30 टक्केच मते आहेत उर्वरित 70 टक्के मते आमच्याकडे आहेत. त्यामुळेच भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत , अशी कबुली देत महाराष्ट्रातील वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असून त्यामुळे ठिकठिकाणी अनपेक्षित निकाल येतील , असा दावा राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान , साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर साताऱ्यात आ. चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा सत्ता गेल्यास संविधान बदलण्याचा प्रयत्न होईल. त्यांना संविधानात बदलायचे आहे. संविधानाचा आत्मा काढून ढाच्या तसाच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होणार आहे असा ढळढळीत आरोप आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
ते म्हणाले , काँग्रेसचा मतदान यंत्रावर (ईव्हीएम) विश्वास नाही.
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान न घेता ते बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी काँग्रेसने वेळोवेळी केली आहे .
इंडिया आघाडीने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढत आहे . त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांना समतावाद्यांचे नेतृत्व करता आले असते . मात्र त्यांनी ती ही संधी गमावली. त्यांना सोबत घेण्याची आमचीही इच्छा होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यातूनही आमचे प्रयत्न सुरुच असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत नऊ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाल्याचे चव्हाण यांनी ठळकपणे नमूद केले.
देशात भाजपकडे फक्त ३० टककेच मते असून, उर्वरित ७० टक्के मते ही काँग्रेस आणि इतर पक्षांकडे आहेत, त्यामुळे या उर्वरित मतांची विभागणी होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, त्याचा परिणाम निवडणुकीत राष्ट्रवादी निश्चित दिसेल. असे चव्हाण यांनी सांगितले.
कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच हमी (गॅरंटी) जनतेला आम्ही दिल्या होत्या, निवडणूक जिंकल्यानंतर त्याची अंमलबजावणीही तत्काळ केली, पण, सध्या मोदींची गॅरंटी असे म्हणत व्यक्तिस्तोम माजवले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
सातारा आबादीत राहील….
लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील मतदारांनी कधीही जातीयवादी विचारांच्या लोकांना थारा दिलेला नाही. स्वार्थासाठी पक्ष बदलूंचा जनतेने पराभवच केला आहे. यावेळीहीही परंपरा कायम राहून सातारा मतदारसंघ आबादीत राहील , असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.