य.मो. कृष्णा कारखाना उभारणार बायोसीएनजी प्रकल्प ; सेंद्रिय शेतीची योजना तयार करणार ; चेअरमन डॉ. सुरेश भोसलेंच्या घोषणा
कुस्तीची परंपरा पुन्हा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव ; 68 वी वार्षिक सभा खेळीमेळीत
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शेती अशाश्वत असली तरी उसाचे पीक स्थिर पीक आहे. त्यामुळे त्यामुळे साखर कारखानदारी कधीही बंद न पडली नाही , उलट साखर उद्योगाचे महत्त्व वाढत असून ते कायम राहणार आहे. या उद्योगाविषयीचे धोरणात्मक निर्णय आता शासनाच्या हाती आहेत. ऊस शेती मधून शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगला दर मिळण्यासाठी इतर प्रकल्पही उभे राहणे गरजेचे आहे. आपल्या कारखान्यात अनेक वर्षांच्या मशिन्स बदलून एक्स्पान्शन केल्याने उत्पन्नात निश्चित वाढ होईल. यापुढे सेंद्रिय शेतीसाठी योजना तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर कारखान्याचा बायोसीएनजी प्रकल्प उभा केला जाणार असून त्यामध्ये इंडियन ऑईल या मोठ्या कंपनीकडून कारखान्यात १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
दरम्यान, कृष्णा कारखान्याने पूर्वीपासून सुरू असलेली कुस्तीची परंपरा पुन्हा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत , असा प्रस्ताव या सभेत मांडण्यात आला.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दिपक पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक जयसिंगराव कदम, दिलीपराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, ब्रम्हानंद पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक संग्राम पाटील, माणिकराव पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, केदार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऊस तोडणी प्रोग्रॅमनुसारच होणार….
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कार्यक्षेत्रात ऊस तोडणी प्रोग्रॅमनुसारच यापुढे होणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन तक्रारींचे तात्काळ निरसन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मात्र नियमानुसार कारखान्यास ऊस पुरवठा न केल्यास शेतकरी फायद्यास मुकू शकेल. इरिकेशनच्या योजना सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
इरिगेशन योजनांच्या अनुदानासाठी प्रयत्न करणार…
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कारखान्याच्या इरिगेशन योजनांचे गणित बिघडत चालले असून त्यांचे पुनरुजीवन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कारखान्याने प्रस्ताव तयार करावा. तो प्रस्ताव देशाचे संरक्षणमंत्री अमित शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठवून शासन स्तरावरून अनुदानासाठी प्रयत्न करू. आपल्या कारखान्याने एफआरपीपेक्षा साधारण ३५ कोटी रुपये सभासदांना जादा देऊ केले आहेत. इथेलॉन, अल्कोहोलनिर्मित केली असून त्यामधूनही कारखान्यास उत्पन्न मिळेल. शेतकरी, सभासदांनीही आपली जबाबदारी ओळखून त्यांनी पिकवलेला ऊस कारखान्यास घालावा, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले तर आभार संचालक धोंडिराम जाधव यांनी मानले. सभेस आजी-माजी संचालक, कारखान्याचे कर्मचारी, तसेच सातारा व सांगली जिल्ह्यातून आलेले सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी व पाणंद रस्त्यांसाठी निधी आणल्याने डॉ. अतुल भोसलेंचे मानले आभार…
डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांच्या विकासकामांसाठी २६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. अनेक गावच्या पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे ऊस घालवताना शेतकऱ्यांना येणाऱ्या दळणवळणाच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. याबद्दल पै. आनंदराव मोहिते यांनी सभासद व विविध गावांतील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अतुल भोसलेंचे आभार मानले. तसेच येणपे, वाठार, काढले, उंडाळे विभागात वाकुर्डेचे पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आविनाश थोरात यांनी डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले. तर कृष्णा साखर कारखान्याने कुस्तींची परंपरा पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करावी, असे सांगत २२ डिसेंबरला कुस्तीचे मैदान घ्यावे, असा प्रस्ताव उमेश पवार यांनी मांडला. उपस्थित सभासदांनी त्याला टाळ्यांनी प्रतिसाद दिला.