कृष्णा कृषी महोत्सवात भोला रेडा, सोन्या अन् सरदार बैल ठरताहेत लक्षवेधक! – changbhalanews
शेतीवाडी

कृष्णा कृषी महोत्सवात भोला रेडा, सोन्या अन् सरदार बैल ठरताहेत लक्षवेधक!

ऊस व हळदीचे वाण, मोत्यांची शेती, रेशीम निर्मिती अशा योजना अन् संकल्पना जाणून घ्यायला हव्यात

चांगभलं-कराड | हैबत आडके
जाफराबादी गीर जातीचा भाला मोठा रुबाबदार ‘भोला’ रेडा..देशातला सर्वात उंच बैल ‘सोन्या’… अनेक नामांकित शर्यतीत नावाजलेला ‘सरदार’ बैल, जातीवंत देशी खिलार, मुऱ्हा , पंढरपुरी , जाफराबादी, गीर आणि संकरीत जनावरे ही येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवात लक्षवेधक ठरली. शेतकऱ्यांची ही दौलत पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक उद्योगांशी संबंधित विविध उत्पादनांचे स्टॉल्स लक्षवेधक ठरत आहेत. ऊस आणि हळदीचे विविध प्रकारचे वाण पाहता येत आहेत. भुईमुगाच्या व इतर पिकांच्या कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या तसेच हंगामानुसार लागवडी योग्य असणाऱ्या जाती , त्याबरोबरच कमी जागेत उत्पन्न मिळवून देणारी शिंपल्यातील मोत्यांची शेती, मत्स्य पालन, रेशीम निर्मितीची प्रक्रिया आणि त्यामधील संधी अशा कितीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांना या प्रदर्शनात प्रत्यक्ष पाहून त्याबाबत इत्यंभूत जाणून घेता येत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृष्णा कृषी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात विविध देशातील प्रतिनिधी सहभागी झाले असल्याने हे कराडमधील पहिलेच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन ठरले आहे. 17 तारखेपासून सुरू असलेल्या आणि 21 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. शुअर शॉट इव्हेंट मॅनेजमेंटच्यावतीने यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात देशातील सर्वात उंच बैल ‘सोन्या’ अनेकांचे आकर्षण ठरला‌. त्यासोबतच विटा येथील शर्यतीत नावाजलेला ‘सरदार’ बैल आणि गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर नूल येथून आलेला 4 वर्षे वयाचा काशिनाथ घुगरे यांच्या मालकीचा जाफराबादी गीर जातीचा ‘भोला’ रेडा, अपशिंगे (कोरेगाव) ची मुऱ्हा म्हैस विशेष आकर्षण ठरली. त्यासोबतच देशी खिलार, पंढरपुरी, मुऱ्हा, गीर जातीची विविध जनावरे, आणि संकरीत गायी पाहत, त्याबाबत त्यांच्या मालकाकडे चौकशी करत होते. अनेकजण जनावरांच्या मालकांना विनंती करून जनावरांच्या सोबत मोबाईलने फोटो काढत होते.

महोत्सवात ऊसाचे फुले 0265, फुले एस केन 15012, फुले एस केन 13007 आदी वाण एका स्टाॅल्सवर ठेवण्यात आले असून खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ते खरेदी करता येत आहे. याशिवाय हळदीचे फुले 10001 हे लवकर पक्वता होणारे व क्षारपड जमिनीसाठी योग्य असणारे वाण एका स्टाॅल्सवर पहाता येत आहे. याशिवाय कमी जागेत होणारी शिंपल्यातील मोती तयार करण्याची शेती (हे मोती कॅरेटवर विक्री होत असतात), तसेच मत्स्यपालन करण्यासाठी लागणारे मत्स्यबीज, त्याचे दर, पिंजरा मत्स्यपालन पध्दत हे सर्व मत्स्यविभागाच्या स्टाॅल्सवर मत्स्यपालन करू इच्छिणाऱ्यांना पाहता येत आहे. याबरोबरच आसपासच्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला , फळे, फुले तसेच विविध प्रकारच्या खतांचे नमुने, पशुखाद्य व त्याचे प्रकार, कडबाकुटी मशीन्स , अवजारे , असे कितीतरी भरगच्च स्टाॅल्स महोत्सवात आहेत.

शनिवार, रविवारी विकेंडमुळे गर्दीचा उच्चांक होणार..
21 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला दरदिवशी गर्दी वाढत आहे. विकेंड असल्याने शनिवारी व रविवारी आणखी गर्दी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close