“भारत-पोलंड ऐतिहासिक मैत्रीला उजाळा! संभाजीराजेंचा गौरव आणि वळीवडेच्या भूमीला जागतिक सन्मान”

कराड, १० जुलै २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
भारत आणि पोलंड या दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय मैत्री केवळ राजनैतिक नात्यापुरती मर्यादित नसून, ती मानवतेच्या पायावर उभी आहे. या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देण्यासाठी राज्यसभेचे माजी सदस्य आणि छत्रपती घराण्याचे वारसदार संभाजीराजे छत्रपती सध्या पोलंड दौऱ्यावर आहेत. वॉर्सा येथे झालेल्या एका खास कौटुंबिक कार्यक्रमात पोलंडचे महामहिम प्रिन्स जान लुबोमिस्र्की-लान्कोरोन्सकी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पोलंडच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
भारताच्या पोलंडमधील राजदूत नगमा मलिक यांनी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांना विशेष पदक देऊन गौरवण्यात आलं. यापूर्वी २०२२ साली पोलंड सरकारने त्यांना ‘Bene Merito’ या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते, त्यानंतरचा हा सत्कार म्हणजे त्या सन्मानाचीच अधिकृत पावती ठरली.
या भावस्पर्शी क्षणाबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय की, “आपल्या राष्ट्राला संकटकाळी केलेल्या मदतीबद्दल आजही संपूर्ण पोलंड देश हा भारत देश आणि छत्रपती घराण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्यांची प्रत्येक कृती आपुलकी आणि आदराने भरलेली असते.”
या भेटीचा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक भाग होता Monte Cassino War Memorial या युद्धस्मारकाला दिलेली भेट. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती आणि राजदूत नगमा मलिक यांच्या उपस्थितीत येथे पुष्पचक्र अर्पण करून दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या युद्धात Maratha Light Infantry च्या अद्वितीय शौर्याचे योगदान आजही जागतिक स्तरावर गौरवाने स्मरणात ठेवले जाते.
पण या भेटीचा खरा गाभा होता वळीवडे गाव! दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीच्या अत्याचारातून वाचण्यासाठी पोलंडमधील हजारो नागरिकांनी भारतात शरण घेतली. त्यातील शेकडो निर्वासितांना कोल्हापूरजवळील वळीवडे गावात छत्रपती घराण्याने आश्रय दिला. त्यांनी त्या वेळी केवळ निवारा दिला नाही, तर माणुसकीच्या नात्याने त्यांना स्वीकारलं.
२०१९ साली या ऐतिहासिक घटनेला ७० वर्षे पूर्ण होत असताना, वळीवडे येथे ५० जणांच्या पोलिश प्रतिनिधी मंडळाने भेट देत त्या काळातील आठवणींना उजाळा दिला होता. संभाजीराजे यांनी त्या घटनेच्या स्मृती जपण्यासाठी वळीवडे येथे स्मारक व वस्तुसंग्रहालय उभारण्याची संकल्पना मांडली होती, ज्याचा पाठपुरावा आजही सुरू आहे.
या वॉर्सा भेटीत संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंडचे भारतातील माजी राजदूत अॅडम बुराकोव्ह्स्की यांचीही भेट घेतली. अॅडम हे हिंदी भाषेचे जाणकार असून, त्यांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे. मुंबई-वॉर्सा थेट विमानसेवा सुरू करण्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
ही भेट केवळ एक औपचारिक दौरा न राहता, भारत-पोलंड मैत्रीला इतिहासाच्या, माणुसकीच्या आणि स्मरणांच्या धाग्यांनी पुन्हा एकदा घट्ट विणण्याचे काम करते आहे. वळीवड्याची भूमी आज केवळ कोल्हापूरसाठी नव्हे, तर जागतिक स्तरावर भारताच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे अत्युच्च प्रतीक बनली आहे.