कृष्णा बँकेला ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्कार जाहीर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट कामकाजाबद्दल ‘बँको ब्ल्यू रिबन २०२४’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जानेवारी महिन्यात लोणावळा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, अविज् पब्लिकेशन आणि गॅलेक्सी इन्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना ‘बँको’ पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या संस्थेने संपूर्ण भारतातील ६५० ते ७५० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणाऱ्या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड ‘बँको’ पुरस्कारासाठी केली आहे.
कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. बँकेने सातात्याने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे.
लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली सिटी येथे २७ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बँकींग परिषदेत या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती, कृष्णा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.