बांबू लागवडीतून देशाला शाश्वत समृद्धी मिळेल : पाशा पटेल
कृष्णा कृषी महोत्सवाचा समारोप; कृष्णा गौरव पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: संपूर्ण जगासमोर पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन ही मोठी गंभीर समस्या उभी आहे. विविध घटकांतून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनमुळे तापमान वाढून ग्लोबल वॉर्मिंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केल्यास, त्यापासून प्राणवायूसह उत्पादित होणाऱ्या विविध सहित्यांपासून पर्यावरण नियंत्रणाबरोबरच देशाला शाश्वत समृद्धीही मिळेल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रशेखर देशपांडे होते.
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्री. पटेल यांनी ‘बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग’ या विषयावर सविस्तर विवेचन केले.
व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, रामकृष्ण वेताळ, कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संजय पाटील, श्रीरंग देसाई, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पाशा पटेल म्हणाले, वाढते प्रदूषण कमी करायचे असल्यास मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होणे गरजेचे आहे. देशात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार आल्यावर इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली. या गोष्टीला तब्बल ७० वर्षे लागली, ही शोकांतिका आहे. एक लिटर पेट्रोल जाळल्यास तीन किलो कार्बन तयार होतो. पृथ्वीच्या वातावरणातील हवेत ३५० पीपीएम ही कार्बन डायऑक्साइड साठवण क्षमता आहे. आता ती ४२२ झाली असून तीच ४५० पीपीएमपर्यंत पोहोचल्यास पृथ्वीवरून मानव सृष्टी नष्ट होईल, असे भाकीत शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी दगडी कोळश्यावर आधारित उद्योग बंद करायला हवेत. याला बांबूचा पयार्य उत्तम असून, एक किलो दगडी कोळसा आणि एक किलो बांबू जाळल्यास त्यापासून एकसारखीच ऊर्जा मिळते. तसेच बांबूतून अत्यंत कमी कार्बन उत्सर्जित होतो. बांबू लागवडीला शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याच्या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुढील वर्षी कृषी महोत्सवात बांबू लागवड व त्यावरील उत्पादनांचा सर्वात मोठा स्टॉल समाविष्ट करण्यात येईल.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कृषी महोत्सवाचा हा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, यापुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची बाबही महत्वाची आहे.
याप्रसंगी कृष्णा कृषी परिषदेचे संचालक ब्रिजराज मोहिते, धनंजय पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, श्रीनिवास जाधव, सुहास जगताप, राजू मुल्ला, शिवाजीराव थोरात, मुकुंद चरेगावकर, कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा गौरव पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान
कृष्णा कृषी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना कृष्णा गौरव आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सचिन थोरात (कार्वे), विनायक पाटील (आटके), सौ. स्वाती पवार (चचेगाव), दत्तात्रय जाधव (कापील), शैलेश थोरात (सवादे), सुनील देशमुख (वांगी), दिग्वीजय पाटील (कामेरी), तात्यासाहेब देसाई (शिरटे), श्रीमती निलिमा जाधव (कराड), वेदांत नांगरे (आगाशिवनगर), कुशल मोहिते (बेलवडे बुद्रुक), ऋतुजा बकरे (कराड) यांना कृष्णा गौरव आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बांबूपासून गेस्ट हाऊस उभारणार
पाशा पटेल यांनी कृष्णा कारखान्यावर बांबूपासून तयार केलेले गेस्ट हाऊस उभारण्याची विनंती आपल्या भाषणातून केली. यावर डॉ. भोसले यांनी लवकरच कारखाना परिसरात बांबूपासून तयार केलेले सुसज्ज गेस्ट हाउस उभारण्याची ग्वाही देत, पुढील वर्षी कृषी महोत्सवात बांबूपासून तयार केलेल्या उत्पादनांसाठी मोठा स्टॉल उभारणार असल्याचेही सांगितले.