फायनलमध्ये क्रिकेट खेळाच्या सर्वच विभागात भारतीय टीमवर वर्चस्व प्रस्थापित करुन टीम ऑस्ट्रेलियाने सहाव्या वेळी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. खरं तर प्राथमिक फेरीतील 9 आणि सेमीफायनलची मॅच सहजपणे जिंकून फायनलमध्ये आलेल्या भारतीय संघाला आपला तिसरा वर्ल्ड कप जिंकण्यात काहीच अडचण येणार नाही, असाच सगळ्यांचा अंदाज होता. मात्र पॅट कमिन्सच्या टीमने स्पर्धेत उत्तरोत्तर आपला खेळ उंचावत नेत फायनलमध्ये टीम इंडियाला सावरण्याची अजिबात संधीच दिली नाही. 2013 नंतर भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप, टीट्वेंटी वर्ल्ड कप किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या सर्वात महत्वाच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात सातत्याने अपयश आले आहे. परवाच्या फायनलसोबतच याआधीच्या स्पर्धांमधील टीमच्या कामगिरीचे विश्लेषण होत राहील. परंतु कालच्या पराभवानंतर भारतीय जनमानसात किंवा सोशल मीडियाच्या विश्वात असुरी आनंद साजरा करणार्यांची संख्या लक्षणीय असल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
अर्थातच हा आनंद होणारे टीम इंडियापेक्षा मोदी सरकारचेच कट्टर विरोधक म्हणता येतील. परवा भारतीय संघाने फायनल जिंकली असती तर त्याचे क्रेडीटही मोदींना जाईल, अशी भिती या भयगंडाने पछाडलेल्यांना होती. त्यामुळे त्यांच्या मनानुसार भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर मिळालेला परमानंद लपवायचा कसा म्हणून या पाखंडींनी सोशल मीडियावर पनौती नामक ट्रेंड किंवा हॅश टॅग पसरवण्यास सुरुवात केली.
काय म्हणे तर मोदी फायनल पाहण्यास आले म्हणून त्यांच्या वाईट पायगुणामुळे भारतीय संघ पराभूत झाला. यामधून त्यांना मोदी ही देशासाठीच नाही तर आपल्या क्रिकेट टीमसाठीही अपशकुनी असल्याचे त्यांना सुचवायचे होते. इतरवेळी कर्मकांड, श्रध्दा, देव (फक्त हिंदू धर्मातील) या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ अंधश्रध्दा असल्याचा निवाडा जाहीर करणारे पुरोगामी, डावे विचारवंत आणि लिब्राडू फायनलमधील पराभवाच्या निमित्ताने मात्र सोशल मीडियातील ट्रेंडसवर पनौती किंवा अपशकुनासारख्या अंधश्रध्देचा जाहीर पुरस्कारच नव्हे तर चढाओढीने प्रसार करताना दिसले.
काँग्रेस सरकारच्या काळात टीम इंडियाने तीन वर्ल्ड कप जिंकले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र एकही वर्ल्ड कप किंवा आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, अशीही एक तर्कशुन्य पोस्ट काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. वर्ल्ड कप जिंकण्याचा आणि काँग्रेस सरकारचा काय संबंध? काँग्रेसच्या काळात वर्ल्ड कप जिंकले म्हणजे भारतीय टीमचे कर्णधारपद किंवा प्रशिक्षक पद इंदिरा गांधी, सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्याकडे होते का? मग उद्या भाजप समर्थकही दावा करतील की काँग्रेसच्या काळात एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडुंना 30 ते 35 पदकेच मिळत होती. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र पदकांची संख्या 100 हून अधिकवर पोहचली.
वास्तविक कोणत्याही सरकारशी कवडीचाही संबंध नसणार्या आयसीसी आणि बीसीसीआय या संपूर्ण स्वायत्त किंवा खाजगी संस्थांनी आयोजित केलेला क्रिकेट वर्ल्ड कप म्हणजे मोदी आणि अमित शहांचा इव्हेंट असल्याची दिशाभूल करणार्यांची अक्कल नेहमीप्रमाणे चरायला गेली आहे. आपल्या देशातील शंभर कोटी जनतेच्या भावनांशी जोडलेला हा खेळ असल्यामुळेच मोदी फायनलवेळी उपस्थित होते. अन्यथा मोदी सरकार आणि वर्ल्ड कपचे आयोजन यांचा कस्पटाचाही संबंध नाही.
काही किंचीत बुध्दीधारकांच्या मते फायनलची मॅच 2011 प्रमाणे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केली असती तर भारतीय संघ निश्चितपणे विजयी झाला असता. हे कोणत्या प्रकारचे मंदबुध्दी लॉजिक म्हणावे? वानखेडेवरील प्रत्येक मॅच आतापर्यंत भारतीय टीमने जिंकली आहे? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर देशात सर्वात अद्ययावत सुविधा आणि सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असल्यामुळेच बीसीसीआयने या मैदानाची निवड फायनलसाठी दीड वर्षांपुर्वीच केली होती. याचे इतके वाईट वाटणार्यांनी वानखेडे स्टेडियमवर सुधारणा करण्यासाठी एमसीएला आतापर्यंत कोणती मदत केली आहे?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे परवा जर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले असते तर हेच लोक मोदी आणि शहांनी आपला इव्हेंट यशस्वी करण्यासाठी बीसीसीआयच्या माध्यमातून मॅचफिक्सींग केले असल्याच्या पोस्टी व्हाट्सअॅप युनिव्हर्सिटीत व्हायरल करताना दिसले असते. एकूण काय तर टीम इंडिया जिंकली किंवा हरली तरी मोदी शहांवर हात धुउन घेण्याचे परफेक्ट नियोजन निश्चित होते.
– दीपक जनार्दन पाटील, मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर
©Changbhalanews