माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने घातलं आटके गावात लक्ष, तलाठी कार्यालय व भक्त निवासाचे केले भूमिपूजन

कराड, दि.२५ | चांगभलं वृत्तसेवा
आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास या विकासकामांचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गावातील लोकनियुक्त पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना इंद्रजीत चव्हाण म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली असून आजही त्या कामांचे भूमिपूजने व उदघाटने सुरू आहेत. विकास हेच ध्येय ठेवून त्यांनी आपले आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वेचले आहे. त्यांच्या निर्णयांचा लाभ राज्यातील आणि देशातील जनतेला झाला आहे. समाजहिताचा विचार करून काम करणारे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे आदर्श राजकारणी आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी इंद्रजीत चव्हाण यांनी पुढे म्हटले की, “कराड दक्षिणमधील गावांनी पृथ्वीराज बाबांवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. आटके गाव त्यामध्ये आघाडीवर राहिले आहे. समाजाचा व धोरणात्मक विकास हाच त्यांचा ध्यास असून, स्वार्थ न साधता समाजहितासाठी कार्य करणारे पृथ्वीराज बाबा हे एकमेव राजकारणी आहेत,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाला आटके गावच्या सरपंच सौ. रोहिणी नितीन पाटील, उपसरपंच रमेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, माजी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, बी. जी. काळे सर, संजय जाधव, हंबीरराव पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात अजितराव पाटील, गजानन आवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले तर बी. जी. काळे सर यांनी आभार मानले.
माजी मुख्यमंत्र्यांची पुतणे इंद्रजीत चव्हाण कराड दक्षिणमध्ये सक्रिय…
माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशात पृथ्वीराज चव्हाण यांना सभा, बैठका आणि पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते, या कालावधीत मतदार संघातील त्यांची नाळ, संपर्क कायम ठेवून लोकांचे प्रश्न सोडवले जावेत, यासाठी त्यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आटकेतील तलाठी कार्यालय व भक्तनिवास भूमिपूजन कार्यक्रमाच्या माध्यमातून इंद्रजीत चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांची ही कृती कराड दक्षिण मधील तळागाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरत आहे.