अश्विनीचा झाला ‘अंश’ : दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये पार पडली अंतिम शस्त्रक्रिया

चांगभलं ऑनलाइन |
तोंडोली ता. कडेगाव येथील अश्विनी खलिपे यांचे अंश खलिपे असे परिवर्तन झाले. त्यांच्यावरती सर गंगाराम हॉस्पिटल दिल्ली येथे तिसरी आणि अंतिम शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉ.भिमसिंग नंदा यांच्याद्वारे यशस्वीपणे करण्यात आली आहे. त्यांना लिंग बदल होऊ शकते समजल्यावर शस्त्रक्रिया करून स्त्रीचे पुरुष झाले आहेत.
बदलणारी समाजमनाची भूमिका आणि बदलणारी ही परिस्थिती अशामध्ये अंश खलिपे यांच्या रूपाने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये पहिलीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. मुळतः अश्विनी यांच्यामध्ये काही पुरुषाचे उपजत गुणसूत्रे असल्याने आणि मनाची होणारी घुसमट यातूनच त्यांनी वैद्यकीय मार्ग काढून अशी भूमिका घेऊन ही शस्त्रक्रिया केली. त्यांच्या या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचे कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार असे सर्वजण त्यांच्या पाठीशी पुर्णतः उभा राहिले. त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठी परिवर्तनाची जिद्द निर्माण झाली. या सर्वांमध्ये अंशने घेतलेली ही भूमिका खरंच समाज बदलण्यासाठी निश्चितपणे योग्य ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदर्श देखील ठरेल. त्यांच्यावरती 2021 पासून अशा पद्धतीने 2 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. ही शेवटची आणि तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ते लिंग परिवर्तन करण्यामध्ये यशस्वी झाले.
शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर डॉ.भीमसिंग नंदा यांनी अशी माहिती दिली की, अंश काही महिन्यांनंतर पूर्णपणे बरा होऊन नवीन जीवन आनंदाने जगू शकतो. तसेच तो लग्न करून देखील स्वतःचे वैवाहिक जीवन सुखात घालवू शकतो.
तसेच यावेळी अंश म्हणाला की मनाच्या द्विधा मनस्थितीत मला जगावं लागत होतं. परंतु मी मनाशी केलेला दृढनिश्चय आणि सर्वांची साथ या जोरावर मी इथपर्यंतचा हा प्रवास करू शकलो. मला या प्रवासामध्ये साथ देणाऱ्या सर्वांचे आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या डॉ.भीमसिंग नंदा व त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो.
त्याच्या या बदलामुळे नक्कीच समाजामध्ये अशा पद्धतीने अडगळीत पडणाऱ्या लोकांना निश्चितपणाने अशा पद्धतीच्या परिवर्तनवादी विचाराची वाट मिळेल. यातून त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक नवी दिशा आणि नवा आदर्श निर्माण होईल. समाजाची बदलणारी भूमिका ही नक्कीच कौतुकास्पद असेल. अंश सारखे अश्विनीचा अंश होऊ पाहणाऱ्या अनेकांना अंशमुळे हिमतीने आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण नक्कीच मिळेल याची खात्री आहे. अशा अश्विनींचा अंश होणं खरंच निसर्गाच्या दृष्टिकोनातून समाजाच्या दृष्टिकोनातून सोयीचे ठरेल.