अर्जुन पुरस्कार विजेती आदितीला मिळाला ‘हा’ पुरस्कार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आदितीने लहानपणापासून घेतलेल्या मेहनतीचे चिज झाले असून तिच्या असामान्य कामगिरीमुळे जगभरात भारतासह सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे, असे गौरवोद्गार खासदार श्रीनिवास पाटील यांनी काढले.
श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘स्व.सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील स्मृती क्रीडा पुरस्कार २०२४’ हा अर्जुन पुरस्कार विजेती, सातारा जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरलेली आंतरराष्ट्रीय तिरंदाज पटू आदिती गोपीचंद स्वामी हिला प्रदान करून तिचा सन्मान करण्यात आला.
सातारा येथील सनबीम आयटी पार्क येथे पार पडलेल्या कार्यक्रमात खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन तिला गौरवण्यात आले. यावेळी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्षा सौ.रचनादेवी पाटील आदी उपस्थित होते.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे. तिने लहानपणापासून घेतलेल्या मेहनतीचे चिज झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळातील वाटचाल सुरू ठेवली होती. तिचे स्वप्न साकार झाले असून आदितीने सुवर्णपदक पटकावून भारत देशाला बहुमान मिळवून दिला आहे. याबद्दल आपल्याला तिचा सार्थ अभिमान वाटतो. तिच्या असामान्य कामगिरीबद्दल श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला असून आदितीच्या कामगिरीचा, तिने घेतलेल्या परिश्रमाचा हा सन्मान आहे.