कराड तालुक्यातील ‘या’ गावात सापडला पुरातन शिलालेख व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वीरगळ – changbhalanews
आपली संस्कृती

कराड तालुक्यातील ‘या’ गावात सापडला पुरातन शिलालेख व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वीरगळ

इतिहास अभ्यासक महेश मदनेंचे संशोधन : गावाचा इतिहास नव्याने उजेडात

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
स्वतंत्र भारताच्या पहिल्या गृहमंत्र्यांचं गाव…पदवीधरांचं गाव.. साहित्य आणि संस्कृतीत भर घालणारं ‘कृष्णाकाठची माती’ हे नामांकित पुस्तक देणाऱ्या लेखकांचं गाव…अन् कराड तालुक्याच्या दक्षिण मांड नदीच्या तीरावर वसलेलं गावं, ‘ओंड’ असं त्याचं नाव! इतिहास अभ्यासक महेश मदने यांच्या संशोधनामुळे या गावाच्या इतिहासावर नवा प्रकाशझोत पडला आहे. त्यांना गावात एक पुरातन शिलालेख आणि ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वीरगळी आढळून आल्या आहेत.

कराड तालुक्यातील ओंड म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचं मुळगाव. तसेच कृष्णाकाठची माती या पुस्तकाचे लेखक भाषातज्ज्ञ व प्रसिद्ध साहित्यिक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचंही गाव. पदवीधरांचे गाव अशीही ओंडची ओळख रूढ झाली आहे. ओंड हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर वसलेलं एक मोठं बाजारपेठेचं गाव आहे. मिरज दर्गवेध परिवाराचे सदस्य व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे इतिहास अभ्यासक महेश मदने यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांच्या समवेत नुकतीच ओंड गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गावाची ऐतिहासिक संदर्भाने नवी ओळख समोर आणली.

याबाबत माहिती देताना मदने यांनी सांगितले की, ‘ओम’ पासून ओंड या शब्दाची निर्मिती झाली असून पूर्वी गावात जैन धर्मीयांची जास्त संख्या होती, अशी आख्यायिका येथे सांगितली जाते.
गावामध्ये अनेक मंदिरे असून बरीच मंदिरे फार पुरातन आहेत. यापैकीच एक आहे मारुती मंदिर. स्वातंत्र्यपूर्व काळात याच मंदिराचा आसरा अनेक भूमिगत क्रांतीकारकांनी घेतला होता, असे सांगितले जाते. १८५७ च्या बंडात सातारा येथे तोफेच्या तोंडी दिलेले क्रांतीवीर हुतात्मा नाना रामोशी यांनी ब्रिटिश पोलीस मागे लागल्यानंतर इथेच आसरा घेतल्यामुळे ते सापडू शकले नव्हते. तेंव्हा त्यांनी कुंडलहून दगड नेऊन इथे पायरी बसवलेची माहिती नाना रामोशी यांचे पाचवे वंशज निवृत्ती मारुती मदने (वय ८५) आजही सांगतात. गावच्या ग्रामदैवत पुरातन मारूती मंदीराबाबत असा ऐतिहासिक संदर्भ निगडीत आहे.

या मंदिराला भेट दिल्यास मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या विरगळ आपले लक्ष वेधून घेतात. काळाच्या ओघात वीरगळ दुर्लक्षित झाल्या आहेत. एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या ठिकाणी मोठा पराक्रम घडल्याचे अधोरेखित करणारी ऐतिहासिक बाब ठरते. भूतकाळात याच ठिकाणी युद्ध रणसंग्राम झाल्याचे या वीरगळ साक्ष देतात. तसा वीरगळ हा कानडी शब्द. ‘वीर कल्लू’ या शब्दापासून तयार झालेला. कल्लू म्हणजे दगड. वीर कल्लू म्हणजे वीरांचा दगड. हिरोज स्टोन. शिलाहर काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती. वीरगळ ही स्मृतीशिळा असल्याने पुढील पिढीस प्रेरणा मिळत असे. वीरगळ ही परंपरा कर्नाटक मधून महाराष्ट्रात आली असे मानले जाते. कर्नाटक राज्यात वीरगळवरती शिलालेख आढळून येतात. त्यामुळे त्यांचा निश्चित कार्यकाल व इतिहास आपल्याला समजतो. त्याप्रमाणे महाराष्ट्रात वीरगळ वरती शिलालेख आढळून येत नाहीत, त्यामुळे निश्चित कार्यकाल समजत नाही. शिलालेख असणाऱ्या अशा वीरगळ मात्र दुर्मिळ आहेत.

अनेकजणांना विरगळ म्हणजे काय माहितच नसते. पूर्वीच्या काळी युद्धभूमीवर वीरमरण येणं पुण्याचं समजलं जात असे. युद्धामध्ये लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे व त्याच्या पराक्रमाचे कायमस्वरूपी स्मरण होण्यासाठी पाषाण शिळेवर विशिष्ट कलेने शिल्पांकन किंवा दगडावर केलेले कोरीव काम म्हणजेच वीरगळ. अशा या वीर शूरवीरांचे स्मारक असलेले हे वीरगळ गावोगावी पाहायला मिळतात. परंतु याबद्दल समाजामध्ये जनजागृती होऊन त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर येणे फार गरजेचे आहे. गावातील मंदिरा शेजारी असणाऱ्या विरगळींना लोक देव समजून जातात व त्यांची पूजाअर्चा करतात. त्यांना तेल वाहतात. आपल्या पूर्वजांच्या लढाऊ वृत्तीच्या, पराक्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून विरगळ समोर आल्यास वीरांच्या स्मृतीला त्यांच्या कार्याला पराक्रमाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व त्यांचा सन्मान होईल.

ओंड मध्ये मारुती मंदिरा शेजारी असणाऱ्या या वीरगळ गावात, गावाच्या परिसरात युद्ध झाल्याची साक्ष देतात. त्या युद्धामध्ये याच गावातील वीर पराक्रमी योद्धा धारातीर्थ पडल्याचा इतिहास सांगतात. अशा योद्ध्यांचा पराक्रम व त्यांच्या स्मृती चंद्र-सूर्य असेपर्यंत समाजासमोर राहण्यासाठी बनवलेलं हे एक स्मृती शिल्प आहेत. या वीरगळमध्ये तीन, कधी चार भाग आहेत. सर्वात खालच्या भागामध्ये घोडदळ व पायदळ यामध्ये युद्ध झाल्याचा युद्धप्रसंग आहे. त्याच्या वरील भागामध्ये स्वर्गारोहण म्हणजेच त्या वीराचा अप्सरांसोबतचा स्वर्गापर्यंतचा प्रवास आणि सर्वात वरच्या भागामध्ये त्या विरास स्वर्गप्राप्ती होऊन स्वर्गामध्ये शिवाचे पूजन करताना दाखवले आहे.

मदने यांनी सांगितले की, या भेटीत व वीरगळ जनजागृती मोहिमेत ओंड गावातील अशा या वीरगळ व त्यांच्या बद्दलची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिला. ओंड येथील या मारुती मंदिराच्या पायरी वरती एक शिलालेख आढळून आला. तो फारच अस्पष्ट असल्याने सध्या तरी त्याचे वाचन करता येत नाही. मात्र पुढच्या टप्प्यात तज्ज्ञांच्यामार्फत अभ्यास करून त्याचे वाचन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सध्यातरी हा शिलालेख गावच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा एक मोठा ऐतिहासिक ठेवा असल्याचे स्पष्ट होत आहे. गावाने हा ठेवा जतन केला पाहिजे, असे वाटते, असेही मदने यांनी सांगितले.

ओंड येथील या वीरगळ जनजागृती मोहिमेवेळी मदने यांच्यासोबत ओंड गावातील डाव्या पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते अशोकराव थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ आडके, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्रचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे उपस्थित होते.

वीरगळ म्हणजे इतिहासाच्या मूक साक्षीदार….

सध्या विरगळीबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे हजारो वर्ष जुन्या असणाऱ्या वीरगळीबाबतची जनजागृती व अभ्यास होणे गरजेचे आहे. सध्या या वीरगळ ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सोसत विखुरलेल्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे त्यांचे जतन व संवर्धन होणे, त्यांचा अभ्यास होऊन माहिती समाजासमोर येणे काळाची गरज आहे. वीरगळ हे शेकडो, हजारो वर्षापूर्वीच्या घडलेल्या इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत.
महेश मदने (पलूस),
इतिहास अभ्यासक,
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र
व दुर्गवेध मित्रपरिवार मिरज.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close