“अनैतिक संबंधातून महिलेचा खून; आठ तासांत पोलिसांचा छडा, प्रियकर अटकेत!”

सातारा | चांगभलं वृत्तसेवा | दि. ८ जुलै २०२५
साताऱ्यातील तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा खुन तिच्या प्रियकराने केल्याचे उघड झाले असून, सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या ८ तासांत हा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. ७ जुलै रोजी दुपारी १२ ते ३.३० च्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात अनोळखी व्यक्तीने घरात घुसून विवाहित महिलेचा निर्घृण खून केला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. भर दिवसा घरात घुसून महिलेचा खून झाल्याच्या या घटनेने जिल्हा हादरला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या खुनामागे पीडितेचा गावातच राहणारा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले. ती विवाहित असून गेल्या सहा वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. आरोपीने तिला पळून जाऊन लग्न करण्याची मागणी केली होती, मात्र पीडितेने नकार दिल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने तिचा खून केला.
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा स्वारगेट (पुणे) येथे माग काढला आणि त्यास अटक करण्यात यश मिळवले.
या कारवाईत सहभागी अधिकारी-पोलिसांचे कौशल्य व तत्परता उल्लेखनीय ठरली असून, सातारा तालुका पोलिसांनी केवळ ८ तासांत गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा तपास सपोनि विनोद नेवसे हे करत आहेत.
पोलिसांचे तपास पथक कौतुकास पात्र…
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे हे करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे, हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राऊत, सचिन पिसाळ, हवालदार कुमठेकर, महिला हवालदार विद्या कुंभार, मोना बोराटे, हवालदार सतीश बाबर, प्रदीप मोहीते, सुनील भोसले, संदीप पांडव, संदीप फणसे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कौशल्यपूर्ण आणि शिताफीने कामगिरी बजावत अवघ्या ८ तासांत आरोपीला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.