चांगभलं ऑनलाइन | शिराळा
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून मांगले ता. शिराळा येथील रामचंद्र कोंडीबा सुतार (वय 60, मूळ रा . राशिवडे, ता. राधानगरी, सध्या या. मांगले) या वृद्धाचा डोक्यात दगड घालून त्याच्या नात्यातील एकाने निर्घृण खून केला. ही घटना गुरुवार, दि. 2 नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मांगले गावातील धनटेक वसाहतीमध्ये घडली. याबाबत इंदुताई रामचंद्र सुतार यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील संशयित संदीप शामराव सुतार वय 35 या. मणदूर ता. गगनबावडा यास शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, संशयित संदीप हा मयत रामचंद्र यांच्या मेहुणीचा मुलगा आहे. रामचंद्र यांचा खून केल्यानंतर संदीप हा घराला कडी लावून झोपला होता. रामचंद्र हे पत्नीसह गेल्या तीस वर्षापासून मांगले येथील धनटेक वसाहतीमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी संदीप सुतार हा रामचंद्र यांच्या घरी आला. त्यावेळी रामचंद्र यांच्या पत्नी इंदुताई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या रात्री घराकडे परतल्या. त्यावेळी पती रामचंद्र दारातच रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आरडा ओरडा केला. तो ऐकून शेजारचे लोक तेथे आले. रामचंद्र यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला मोठा दगड आढळून आला. त्यावरून रामचंद्र यांचा डोक्यात दगड घालून खून झाल्याचे समोर आले. मृतदेहा शेजारी संशयित संदीप सुतार याची डायरी व एक मतदान ओळखपत्र पडले होते.
या घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरील रक्ताने माखलेला दगड डायरी व मतदान ओळखपत्र पोलिसांनी जप्त केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. याबाबत इंदुताई सुतार यांच्या फिर्यादीवरून शिराळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित संदीप सुतार यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत.