घरनिकी शाळेत नवागतांचे उत्साही स्वागत; फुलले मुलांच्या चेहऱ्यावर हास्य!

आटपाडी | चांगभलं वृत्तसेवा
घरनिकी, (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत फुलांच्या पुष्पगुच्छांनी करण्यात आले. या निमित्ताने शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रारंभी नव्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विविध स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व भावनिक विकासास चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेचा अनोखा अनुभव मिळाला.
दुपारच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न देण्यात आले. नवीन कपडे, पुस्तके, आणि स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पालकांनी आणि ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला घरनिकी गावचे सरपंच आप्पासो पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल तोरणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ माने, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा प्रवेशोत्सव यशस्वीपणे पार पडला. शाळेच्या या उपक्रमामुळे ‘शाळा माझे घर’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली असल्याचे पालकांनी सांगितले.