चिकुर्डे तलाठी कार्यालयाची आण्णासाहेबांना अलर्जी
सात महिन्यांपासून तलाठी गायब, शेतकरी अन् ग्रामस्थांची ससेहोलपट
चांगभलं ऑनलाइन | ऐतवडे बुद्रुक प्रतिनिधी
गेल्या सात महिन्यांपासून चिकुर्डे महसूलचा कारभार रामभरोसे सुरू आहे. सात महिन्यात दोन चार दिवस वगळता, या कार्यालयात अण्णासाहेबांनी तोंड दाखवलेले नाही. त्यामुळे झिरो तलाठी देखील इथे कधीही येतात अन् जातात, याचा थांगपत्ता लागत नसल्याने ग्रामस्थांची पुरती गैरसोय होत असल्याचे वास्तव आहे.
वास्तविक चिकुर्डे हे जि. पा. मतदार संघातील मोठे गाव आहे. याअंतर्गत ठणापुडे हे देखील गाव येते या गावांचा महसूल कारभार इथून चालतो. मात्र गेल्या सात महिन्यांपासून तत्कालीन तलाठी सोनाली चव्हाण रजेवर गेल्या. तदनंतर तीन चार महिने हे कार्यालय तलठ्याविना चालले. अखेरीस ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. अन् कार्यालयात तात्पुरता कार्यभार म्हणून सिद्धेश्वर पवार रुजू झाले. मात्र हे महाशय हजर झाल्यापासून कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांची मात्र ससेहोलपट सुरू आहे.
प्रत्यक्षात निवडणुकीचे काम असल्याचे सांगून अद्याप ते कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत, ही खेदाची बाब आहे. सार काही अलबेल सुरू असताना याकडे मंडल अधिकारी यांना लक्ष द्यायला वेळ नाही. तर वरिष्ठांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यामुळे लोकसेवक असलेले महाशय मात्र लोकांचे मालक असल्यासारखे वागत आहेत, ही खेदाची बाब आहे. हे पाहता, स्थानिक लोकनेते, अन् लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष घालून या महाशयांना जाब विचारणे गरजेचे आहे. तर वरिष्ठांनी कारवाईचे धाडस दाखवणे काळाची गरज आहे.
झिरोचा कारभार… भरला दरबार.!
या कार्यालयात झिरो तलाठी म्हणून एक महाशय कार्यरत आहे. तलाठी नसल्याने हे स्वतः कधी येतात अन् कधी जातात याचा थांगपत्ता नाही. मुळातच अशासकीय सदस्य या कार्यालयात असणे नियमबाह्य आहे, मात्र अण्णासाहेबांनी स्वतः च्या फायद्यासाठी त्यांना ठेवल्याने या दोघांचा कामाच्या नावाखाली वेगळाच धंदा सुरू आहेत. एकूणच या झीरोचा कारभार…. दरबार भरल्यासारखा सुरू आहे.
शेतकरी अन् विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी..!
चिकुर्डे हे मोठे गाव आहे. तरी देखील इथे तलाठी येत नाहीत, त्यामुळे शेतकरी यांना सात बारा आणि इतर कामासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर आता विद्यार्थांना देखील दाखल्यांसाठी ताटकळत बसावे लागत आहे. याकामी ग्रामपंचायतीने देखील लक्ष घालून शासकीय अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून ही गैरसोय टाळावी.
– संजय भोसले, संस्थापक, रा. बा. पा. सोसायटीे, चिकुर्डे