कराड-विद्यानगर येथील बेकायदा सुरू असलेल्या अकॅडमीबाबत सर्व राजकीय पक्ष व २२ संघटना आक्रमक
प्रांताधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहराला शैक्षणिक क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे, आजही विद्यानगरी परिसरात २२ हजारहून अधिक विद्यार्थी विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून राज्यभरातून येऊन शिक्षण घेत आहेत. मात्र या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा उद्योग काही बेकायदा सुरू असलेले अकॅडमी चालक करीत असून पालकांच्याकडून लाखो रुपयांची बेसुमार फी घेऊन मोठी फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याविरुद्ध विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी प्रांताधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षरशा: पत्र्याच्या खोलीत अथवा फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे व शिक्षकाची कोणतीही पदवी नसलेले शिक्षक हे पालकांच्याकडून अक्षरशः लाखो रुपये फी गोळा करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा उद्योग करीत आहेत. कराड-विद्यानगर परिसरात सुमारे ८० अकॅडमी असून या अकॅडमी चालकांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नाही, अथवा शिक्षण विभागाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी फसवणूक होत असून या विरोधात आज (सोमवारी ) कराड शहर व तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाई या विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हा सैनिक फेडरेशन, पालवी महिला मंच, शैक्षणिक क्रांती संघटना, क्रीडा प्रशिक्षक संघ अशा २२ विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कराड विद्यानगर परिसरात सुरू असलेल्या विनापरवाना व बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांना निवेदन दिले.
दरम्यान, कराड विद्यानगर येथे सुरू असलेल्या बेकायदा अकॅडमींची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.