स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ‘या’ साखर कारखान्यानं दिलं पहिल्या उचलेबाबत लेखी आश्वासन – changbhalanews
शेतीवाडी

स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ‘या’ साखर कारखान्यानं दिलं पहिल्या उचलेबाबत लेखी आश्वासन

अन्य कारखान्यांचं काय, : संघटनेसह शेतकऱ्यांचा सवाल

 

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

साखर कारखानदारांनी मागील तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये प्रमाणे द्यावा तसेच यंदा गाळपास जाणाऱ्या उसाला अगोदर पहिली उचल जाहीर करावी मगच ऊस तोडणी सुरू करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन करत कराड तालुक्यातील वाठार व पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. वाठार येथे कृष्णा कारखान्याकडे तर पाचवड फाटा येथे रयत कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली. दरम्यान, स्वाभिमानी संघटनेच्या या आंदोलनानंतर कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने येत्या चार दिवसात ऊस दर जाहीर करू, असे लेखी आश्वासन स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांना दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षीच्या उसाला 400 रुपये व चालू वर्षाच्या उसाला 3500 पहिली उचल जाहीर करून कारखाने चालू करा, अशी मागणी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने अद्यापही ऊसाची पहिली उचल जाहीर केलेली नाही. अथवा मागील वर्षीचे 400 रुपये देण्याची भूमिका घेतलेली नाही.

त्यामुळे आज शनिवारी वाठार तालुका कराड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली तसेच पाचवड फाटा तालुका कराड येथे सुद्धा रयत कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. तसेच यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे , पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ आणि कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृष्णा कारखान्याने दिलेले लेखी आश्वासन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावेळी ऊस दर जाहीर करण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम होते. त्यामुळे कारखान्याचे शेती अधिकाऱ्यांनी यावेळी चार दिवसात ऊस दर जाहीर करू, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचं काय…?

दरम्यान कृष्णा सहकारी साखर कारखान्यानं येत्या चार दिवसात ऊस दर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे, मात्र तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांचे काय? ते केंव्हा पहिली उचल जाहीर करणार आहेत? असा सवाल आंदोलनकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close