किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…भाग 2 – changbhalanews
राज्य

किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…भाग 2

चांगभलं ऑनलाइन | मालवण
किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…

जनता माफ करणार नाही. आगामी निवडणुकीत यांना पराभवाची धूळ चारणारंच…

मालवण येथील राजकोट समुद्र किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पावसात‌ कोसळल्याची दुर्दैवी घटना म्हणजे तमाम शिवप्रेमींच्या अस्मितेचा अपमान आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. निवडणुकांच्या काळात जनतेची मनं जिंकण्यासाठी अशा प्रकारचा हा सगळा यांचा बनाव असतो. यांच्या भ्रष्टाचारी कारभारातून देशभरात करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची यादी मोठी आहे. कुठे पूल कोसळतोय, कुठे रस्ते खचताहेत.. आणि आता ही घटना.. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे दर्जाहीन काम महाराष्ट्राची जनता कदापि खपवून घेणार नाही. या नाकर्त्या सरकारनं कोणाकडे बांधकामाची जबाबदारी सोपवली होती? पुतळा उभारण्यासाठी कोणते मटेरियल वापरले गेले? या सगळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. सरकारकडून अक्षरशः सर्व सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. याचे परिणाम या सरकारला लवकरच भोगावे लागणार. महाराज आम्हाला माफ करा. या कमिशनखोर सरकारने तुमची अशी विडंबना केली. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. जनता माफ करणार नाही. आगामी निवडणुकीत यांना पराभवाची धूळ चारणारंच..या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो..!
– खा. वर्षा गायकवाड (नेत्या, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष).

हे भाजपाच्या नाकर्त्या प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे…

सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ला येथे नौदल दिनाच्या निमित्ताने २०२३ ला डिसेंबर महिन्यात मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळल्याची घटना अतिशय लाजिरवाणी आहे. निकृष्ट बांधकामामुळे पुतळा कोसळला आहे आणि हे भाजपाच्या नाकर्त्या प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक गोष्टीत खायचं किती याच ताळतंत्रच या सरकारने सोडलंय.

‘खोटं बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे भाजप सरकारचा कारभार चालू आहे. भाजपच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराने अक्षरशः कहर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेवरच घाला घालणाऱ्या ऱ्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.
– आ. डॉ. विश्वजीत कदम (राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते).

इव्हेंटबाज सरकारने आमच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान केला आहे….

राजे ! तुम्हाला असं कोसळलेलं पाहून काळजात धस्स झालं !!

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत आज मालवण येथील पुतळा दुर्घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्याठिकाणी असणारे पुतळ्याचे अवशेष पाहून मनाला वेदना झाल्या. ज्या शिवछत्रपतींनी रयतेच्या सुखासाठी स्वराज्य उभे केले, त्यांचा कोसळलेला पुतळा पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या वाट्याला आले.

प्रत्येक गोष्टीचा केवळ गाजावाजा करणाऱ्या इव्हेंटबाज सरकारने आमच्या अस्मितेचा, दैवताचा अपमान केला आहे. याबाबत जनभावना तीव्र आहेत. सरकारने दोषींवर तातडीने कारवाई करावी. त्यात हयगय सहन केली जाणार नाही.
– आ. सतेज उर्फ बंटी पाटील (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नेते).

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close