किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या काय आहेत प्रतिक्रिया…भाग 1
चांगभलं ऑनलाइन | मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२४ रोजी अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटाचा भव्य पूर्ण कृती पुतळा ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील शिवप्रेमीमध्ये वाढलेला रोष पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार डॉक्टर चेतन पाटील या दोघांविरोधात मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेवरून मनसे सह राज्यातील विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेतेमंडळींच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. तर 1957 मध्ये पंडित नेहरू हे पंतप्रधान असताना किल्ले प्रतापगडावर उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा पुतळा आज ही दिमाखात उभा आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा अवघ्या एक वर्षाच्या आतच कसा काय कोसळला ..? असा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.
कुसुमाग्रजांची कविता शेअर करत राज ठाकरेंची पोस्ट…
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?
मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती ? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील
पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले, मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि,
ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.
-राज ठाकरे , अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला.. राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला..!!
आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका…!! नौदल दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला..!!
– राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.
बीजेपी सरकार में भ्रष्टाचार चरम पर है।..
नरेंद्र मोदी ने 4 दिसंबर, 2023 को महाराष्ट्र के राजकोट में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण किया।
अब करीब 8 महीने बाद छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढह गई। हालात ये हैं कि भ्रष्टाचार के मामले में महापुरुषों को भी नहीं बख्शा जा रहा है।
– राष्ट्रीय काँग्रेस पक्ष.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शेअर करण्यात येत असलेला 1957 सालचा पंडित नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेला प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा हा व्हिडिओ
महाराज तुमचा अवमान करणाऱ्या गद्दारांना आम्ही गाडणारच !
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घाई घाईत मिंधे- भाजप सरकारने सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक केवळ ८ महिन्यांत कोसळले.
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.
भाजपाच्या भ्रष्ट कारभाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज दुपारी कोसळला. निकृष्ठ बांधकामामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला !
मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार !
आता त्याठिकाणी पुनःश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बाधणी झाली पाहिजे.
– संभाजीराजे छत्रपती (स्वराज्य पक्ष)
आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही !
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ ८ महिन्यातच कोसळलं. मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे.
त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही.
आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं! महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं !
– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख (शिवसेना उबाठा).
राष्ट्रीयकामात खाऊबाजी यामुळेच हे घडलं…
हे चित्र मराठी मनाला विचलीत करणारे आहे. श्रेयघेण्याची घाई. निवडणुकांचे राजकारण. आणि राष्ट्रीयकामात खाऊबाजी यामुळेच हे घडले. गद्दारांचे दिल्लीश्वर पुतळ्याची प्रतिष्ठापना करतात हीशिवरायानीच झिडकारले. सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राजीनामा द्या!
– खा. संजय राऊत (शिवसेना उबाठा नेते).
इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही.
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू आहे.
राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं. त्यांचे आचार, विचार, कृतीचा सन्मान होतोय का याबाबत सरकारला घेणेदेणे नाही. जाहीर निषेध !
– आ. जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी शप).
ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदार आणि त्याच्या संस्थेला काळया यादीत टाका..
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
– खा. सुप्रिया सुळे , (नेत्या, राष्ट्रवादी शप).
विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा…
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे “शक्तीस्थळ” असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे. सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे.
– खा. डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शप).
टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे निचपणाचा कळस आहे…
प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १०% वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५% वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरु केला असून ५०००० कोटीची दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली आहेत.
एकीकडं कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडं तिजोरी खाली असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपलंय. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडं पाठ फिरवलीय.
महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणं गरजेचं असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणं खूप कठीण होऊन बसेल.
– आ. रोहित पवार, (राष्ट्रवादी शपथ).
जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरुवातीपासूनचे धोरण…
“नौदल अधिका-यांच्या सूचनांनानुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तीकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे.
ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर कामाच्या दर्जा काय असेल, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही. जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे. ज्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभर ताठ मानेने हिंडतो आज त्याच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पापाला कुठलंही प्रायश्चित नाही.
– आ. जितेंद्र आव्हाड, (राष्ट्रवादी शप).
छत्रपतींच्या मूल्यांना आधारित हे सरकार नाहीच, हे सिद्ध झाले आहे….
महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान, स्वराज्याचे मूळ. शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले अजून शाबूत आहेत पण २०२३ रोजी सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे.
पंतप्रधान मोदी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आता हा पुतळा कोसळला. आठ महिन्यात छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. किमान तुमच्या टक्केवारीत छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडायला हवे होते.
छत्रपतींच्या मूल्यांना आधारित हे सरकार नाहीच, हे सिद्ध झाले आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे हे आम्ही का म्हणतोय हे आज महाराष्ट्रातील जनतेला दिसतय.
या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, पण ज्यांनी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची अहवेलना केली असेल त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदाराचे सुरू असलेले सर्व काम तातडीने काढून घेण्यात यावे ही आमची मागणी आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे.
– विरोधी पक्ष नेता आ. विजय वडेट्टीवार (राष्ट्रीय काँग्रेस).
दुसऱ्या भागात वाचा पुढील प्रतिक्रिया….