
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
काॅंग्रेसची आज जी काही राज्यात पिछेहाट झाली आहे, त्याला पृथ्वीराज चव्हाण हेच कारणीभूत आहेत. सत्ता गेल्यावर आता त्यांना शहाणपण सुचतंय, अशी खरमरीत टीका करत महाराष्ट्रात सरकार घालवण्याचं आणि काॅंग्रेसची वाताहत करण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण यांनीच केलंय, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
काॅंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकार २०१४ साली गेलं नसतं तर मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं असतं, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केल होतं. या वक्तव्याचा महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मराठा आरक्षणाबाबत मंत्री विखे- पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्रीनी आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली आहे. लवकरच नहिवाळी अधिवेशन सुरू होत असून अधिवेशनात चर्चा होईल. याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.
सरकार पृथ्वीराज बाबांनी घालवलं….
राज्यातील तत्कालीन सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराजबाबांनीच केलं. दुर्देंवाने आज जी महाराष्ट्रात काॅंग्रेसची पिछेहाट झाली आहे, वाताहत झाली आहे, त्याला फक्त पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहेत. आता सरकार गेल्यावर त्यांना शहाणपण सुचतयं, सरकार असतं तर दिल असतं अशा म्हणण्यात काही तथ्य नाही.
पावसात भिजण्याचा शकुन की अपशकून हे काळ ठरवेल….
शरद पवार साताऱ्यात पावसात भिजले होते, त्याचा राष्ट्रवादीला निवडणुकीत मोठा झाला होता. काल ठाण्यातही ते पुन्हा पावसात भिजले, त्यामुळे हा २०२४ साठी शुभशकुन असल्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, त्यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. कुणाला वाटतं तो शुभशकुन तर, कुणाला वाटतं अपशकुनं. पण हा कोणता शकुन आहे हे प्रत्यक्षात काळच ठरवेल. तोपर्यंत वाटू पाहूया.
काँग्रेसच्या गोटात खळबळ….
दरम्यान पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते, तथा विद्यमान सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेषता: पृथ्वीराज चव्हाण विरोधी गटाला विखेंच्या या विधानामुळे आयते कोलीत मिळाल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांची कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.