लाडकी बहिण योजनेबाबत आ. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ ; सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगणार – changbhalanews
राजकियराज्य

लाडकी बहिण योजनेबाबत आ. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ ; सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगणार

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
राज्याच्या सरकारी तिजोरीची क्षमता नसताना असंख्य योजना राबवल्या जात आहेत. हेच सावत्र भावाचे प्रेम आहे. त्यामुळे ते फक्त तुम्हाला तीन महिन्यांसाठी मदत करणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे आज बोलताना केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील भाऊ निवडून आले की तुमच्या पदरात अधिक सक्षम योजना घालू, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा कवच प्रदान करू, असा शब्द जयंत पाटील यांनी या सभेत दिला.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी सरकारने पहिल्या वर्षासाठी 35000 कोटीची तरतूद केल्याचे व योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे कालच सातारा येथील कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. तसेच जसजसे पैसे उपलब्ध होतील, तसा या योजनेचा निधी दीड हजारावरून तीन हजारापर्यंत नेण्यात येईल, असेही त्यांनी महिलांना आश्वस्त केले होते. विरोधकांनी ही योजना बोगस आहे, चुनावी जुमला आहे, निवडणुकीपूर्ती चालेल, असे बरेच आरोप केले होते, ते कोर्टातही गेले होते, मात्र महिलांच्या खात्यावर पैसे आले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले, असे म्हणत, विरोधक जेवढी या योजनेवर टीका करतील, माता भगिनींचा अपमान करतील , तेवढेच ते अडचणीत येतील, असे शिंदे यांनी म्हटले होते. तर उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना खटाखट नसून फटाफट असल्याचे सांगत सावत्र भाऊ जर चुकून सत्तेवर आले तर ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जशा आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना बंद करण्यात आल्या, तशीच लाडकी बहीण योजना बंद करतील, अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्यावर केली होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सरकारी तिजोरीची क्षमता नसताना लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या जात असून हेच सावत्र भाऊ तीन महिन्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत, असा थेट आरोप केला आहे.‌ त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये येणाऱ्या काळात चांगलीच जुगलबंदी होणार असल्याचे दिसत आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील ५००० भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज सुरक्षा कवचाची अनोखी रक्षाबंधनाची भेट देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश संघटक तथा अकोला येथील जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले की, आपल्या घरातला मुलगा बेकार आहे. याचे कारण आपले नाकर्ते सरकार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी कोणीच लाडके नव्हते. मात्र तुम्ही जी मतरूपी चपराक मारली त्याने सगळे ठिकाणावर आले आहेत. म्हणून असंख्य योजना सरकारी तीजोरीची क्षमता नसताना राबविल्या जात आहेत. हे सावत्र भावाचे प्रेम आहे. त्यामुळेच फक्त तीन महिन्यांसाठी तुम्हाला मदत करणार आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील भाऊ जिंकून आले की, तुमच्या पदरात अधिक सक्षम योजना घालू.

आज सम्राट डोंगरदिवे यांनी येथील भगिनींना राष्ट्रवादी सुरक्षा कवच दिले. मी आपल्याला शब्द देतो की, निवडून आल्यावर हे सुरक्षा कवच संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना आम्ही देऊ., असे आ. जयंत पाटील यांनी यावेळी जाहीर करून टाकले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close