अबब…सातारा जिल्ह्याला विभागीय स्तरावरील 16 पुरस्कार
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
– सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-अवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार जाहीर झाले, त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले. घरकुल पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे या वर्गवारीत सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, फलटण येथील उप विभागीय अधिकाऱ्यांनी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, कोरेगाव उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक आणि फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना विभागीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हय़ातील आवास योजनेचे काम राज्यात गुणात्मक दर्जेदार असल्याचे सांगून श्री. संतोष हराळे, प्रकल्प संचालक व त्यांची टीम तसेच सर्व गट विकास अधिकारी यांच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामाचे कौतुक केले. तसेच सर्व प्रांत व तहसीलदार यांना घरकुलासाठी भूमिहीन बेघर लाभार्थीना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
राज्यातील विविध आवास योजनाचा कार्यक्रम जलद गतीने पुढे जावा, लाभार्थींची गुणवत्तापूर्वक घरकुले बांधली जावीत या उद्देशाने विविधस्तरावर (ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा, विभाग) येथील कामाचे मूल्यमापन करून त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे करिता विविध टप्प्यावर प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-अवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार जाहीर झाले, त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले
या छोटेखानी कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.