माणसाची संवेदनशीलता माणसाला मोठं आणि श्रीमंत बनवते ; ऐश्वर्या पाटणकर
ब्रह्मदास विद्यालयात महिला दिन साजरा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“समाजात मोठं होण्यासाठी केवळ आर्थिक संपत्ती पुरेशी नाही, तर संवेदनशील मन आणि दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची समज महत्त्वाची असते.”, असे मार्मिक विचार प्रखर वक्त्या ऐश्वर्या पाटणकर यांनी ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.
समाजातील महिलांचे योगदान, त्यांच्या समस्या आणि सशक्तीकरण यावर भर देत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
ऐश्वर्या पाटणकर म्हणाल्या, “आपल्याला लहान नाही, महान व्हायचं आहे. समाजात मोठं होण्यासाठी केवळ आर्थिक संपत्ती पुरेशी नाही, तर संवेदनशील मन आणि दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची समज महत्त्वाची असते. जगात आई-वडिलांइतकं निस्वार्थी प्रेम कोणीही करू शकत नाही. त्यामुळे कुटुंब आणि समाज यांचा परस्पर सहकार्याने विकास व्हायला हवा.”
तसेच, डिजिटल युगात चुकीच्या माहितीचा प्रसार कसा होत आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. “आज व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ही अफवांची प्रमुख माध्यमं बनली आहेत. कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता तिचा प्रसार केला जातो. त्यामुळे समाजात गैरसमज वाढतात. हे टाळण्यासाठी महिलांनी जागरूक राहणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
महिलांच्या समस्या, त्यांचे समाजातील योगदान, शिक्षण आणि सशक्तीकरण यासंबंधी या व्याख्यानातून विचारमंथन करण्यात आले. उपस्थित महिलांनीही आपले अनुभव आणि प्रश्न मांडले.
ब्रह्मदास विद्यालयाच्यावतीने महिलांसाठी दरवर्षी अशा प्रकारच्या प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना हक्कांचे स्थान मिळवून देण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. विद्यालयाने यापूर्वीही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत शिक्षण आणि सामाजिक विकासाला चालना दिली आहे. बेलवडे बुद्रुक मधील शिक्षणप्रेमी विकास मोहिते यांच्या सहकार्यातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्कॉफ मार्गदर्शन पुस्तिका निर्मिती मध्ये तज्ञ् मार्गदर्शक म्हणून काम केल्याबद्दल श्री. पी. टी. पाटील सर यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस.वाय.माने, कार्याध्यक्ष जे. बी. माने, उपकार्याध्यक्षा सौ.एस. एस.जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. टी. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान मोहिते, माजी अध्यक्ष अंकुश मोहिते, तसेच शिक्षक समृद्धी 2.0 चे तज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत तडाके, विकास यादव , स्वाती मोहिते, मनिषा मोहिते, शुभांगी मोहिते, अककाताई कुंभार, निकिता कुंभार, कविता मोहिते, पल्लवी मोहिते, ज्योती मोहिते, दिशा कुंभार, दीपाली साळुंखे, अश्विनी मोहिते, विद्या माने, अपर्णा पवार, भारती पवार, माधुरी मोहिते, रूपाली पवार यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. बी. माने तर आभार सौ. एस. एस. जाधव यांनी मानले.