तिसरीच्या वर्गातील मुलीचं थेट नितीन गडकरींना पत्र – changbhalanews
निसर्गायनराज्य

तिसरीच्या वर्गातील मुलीचं थेट नितीन गडकरींना पत्र

लिहीलंय असं काही की चर्चा झालीय राज्यभर

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।
पक्षी ही सुस्वरे आळविती।।
येण सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष अंगा येत।।
अशी निसर्गाची महती जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगून ठेवलीयं. मात्र सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात नव्या पिढीकडून सेल्फी पुरतंच निसर्गायन जपलं जातंय की काय, अशी चिंता निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी व्यक्त करत असताना नव्या पिढीवरही निसर्गाचा संस्कार अद्याप कायम असल्याचं चित्र एका तिसरीच्या वर्गातील चिमुकलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रावरून समोर आलंय. “माझे पप्पा तुमचे फॅन आहेत पण, त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. ते म्हणाले डायरेक्ट विचार. म्हणून तुम्हाला पत्र लिहीत आहे”,  असं म्हणत या चिमुकल्या मुलीनं थेट केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाच हे पत्र धाडलंय! त्यामध्ये तिने व्यक्त केलेल्या भावना कोकणवासींयासह संपूर्ण महाराष्ट्रातील निसर्ग आणि पर्यावरणाबाबत संवेदनशील असलेल्या माणसांच्या काळजाला भिडताहेत. त्यामुळेच तर तिचं भरभरून कौतुक होतंय.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणजे राजकारणातला एक ‘संवेदनशील नेता’. राजकीय पक्ष, तत्व, निष्ठा, विचारधारा या पलीकडे जाऊन राजकारणाचा आणि राजकारणातल्या माणसांचा विचार करणारा मोठा वर्ग समाजात आहे. या वर्गाकडून गडकरी यांच्या कार्याचं नेहमीच कौतुक होतं आलंय. “मला फक्त कामाची क्वालिटी हवी. दर्जाबाबत माझ्याकडे तडजोड नाही” असं ते ठेकेदार अन् अधिकाऱ्यांना नेहमी सुनावत असतात. “ठेकेदारांना वेठीस धरू नका, तरच रस्त्यांची कामं दर्जेदार होतील” असं गडकरी सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींना जिथं तिथं आवर्जून सांगत असतात. रस्त्यावरचे अपघात टाळून जीव वाचवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाबाबत महिंद्रा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ‘संवेदनशील विकास’ असं ट्विट करत गडकरींची प्रशंसा केली होती. पण या ‘विकासाच्या’ महामार्गांचे चौपदरीकरण, सहापदरीकरण होत असताना रस्त्याकडची भली मोठी झाडं तुटली जात आहेत. हे चित्र पाहताना निसर्गप्रेमी नागरिकांच्या मनाला अगणित वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. पण बोलणार कोण? अन् किती? पण तिसरीच्या वर्गातील मंजुल सरदेसाई या मुलीनं हे धाडस केलंय. “तुटलेल्या झाडावरील पक्षी कोठे गेले असतील, या विचाराने मला रडायला आलं. तुमची माणसं डोंगर वाटेल तसा खणत आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या जंगलवाटा नष्ट होत आहेत. मग उन्हाळ्यात प्राणी पाणी पिण्यासाठी नदीकडे कसे जातील?” असा साधा पण थेट काळजाला भिडणारा प्रश्न तिने पत्रातून गडकरी आजोबांना विचारलाय.
मजुलचं हे पत्र गडकरी आजोबांपर्यंत नक्की पोहोचणार आहे. कारण ती जबाबदारी घेतलीय गडकरींच्या सौभाग्यवती कांचन गडकरी यांनी. त्या सध्या कोकण देवदर्शन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी नुकतीच गणपतीपुळेतील गणेश मंदिर आणि वैभव सरदेसाई यांच्या गणपतीपुळेच्या प्रकल्पांना भेट दिली. त्यावेळी तिसरीच्या वर्गात शिकणारी सरदेसाई यांची मुलगी  मंजुल हिने कांचन यांच्याकडे श्नी. गडकरी यांना देण्यासाठी तिचं हे पत्र दिलं आहे. मंजुलचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालंय. नेटिझन्सनी तिच्या निसर्ग प्रेमाचं भरभरून कौतुक केलंय. त्यामुळे पत्र पोहोचताच गडकरी आजोबा मंजुलला काय उत्तर देताहेत याकडे कोकणवासींयासह राज्यातील तमाम निसर्गप्रेमींचं लक्षं लागलंय.
मंजुलचं हे पत्र आहे असं…
      ” मा. गडकरी आजोबा यांस,
                  सा.न.वि.वि.
               मी मंजुल वैभव सरदेसाई,
मी महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात रहाते. मी माझ्या आईबाबा बरोबर खुप फिरते. सर्वत्र रस्ते बांधण्याचे काम खुप वेगाने सुरू आहे. पण ते बांधत असताना आधी असलेली खूप मोठी आंबा, सातवीण, वड अशी झाडं तोडून टाकली जात आहेत. नुकतेच पाली ते कोल्हापुर महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याने मी माझ्या मोर्डे या गावी जाते. या परिसरातील एवढी झाडे तोडली आहेत की मला रस्ताच ओळखता आला नाही. या झाडांवरील पशुपक्षी कुठे गेले असतील, या विचाराने मला रडायला आले.
आजोबा, तुमची माणसे डोंगर वाटेल तसे खणत आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या जंगलवाटा नष्ट होत आहेत. उन्हाळ्यामध्ये डोंगरातील पाणी आटले की जंगलातील प्राणी पाणी प्यायला नदीकडे कसे
जातील, या विचाराने माझा घसा कोरडा पडतो आहे. एखादे वळण वाढले तरी चालेल, पण डोंगर कमीतकमी खणा असे तुमच्या माणसांना सांगाल का? माझे बाबा तुमचे फॅन आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडेही नाहीत. ते म्हणाले की तुम्हालाच डायरेक्ट विचार. म्हणुन पत्र लिहीत आहे.
कळावे.
तुमची नात,
मंजुल सरदेसाई
इ. ३ री.”

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close