कराड येथे 31 मार्च रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार
संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांची माहिती
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक 2024 च्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी इंडिया आघाडीची कराड तालुक्यातील पहिली बैठक येत्या 31 मार्च रोजी दुपारी 4 वाजता येथील पंकज मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, इंडिया आघाडीचा सातारा लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार असेल याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगून अंतिम निर्णय झाल्यानंतर उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले.
यावेळी माजी सहकार व पणन मंत्री , आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. संगीता साळुंखे, राष्ट्रवादी कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. समीर देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रीय काँग्रेसचे शिवराज मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनोहर शिंदे म्हणाले, वरिष्ठ पातळीवर ठरल्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक होणार आहे. त्याची सुरुवात 31 मार्चला कराड येथून होत आहे. यावेळी तालुक्यातील इंडिया आघाडीचे सर्व घटक या बैठकीमध्ये सहभागी झालेले दिसतील.
हर्षद कदम म्हणाले, इंडिया आघाडीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याचे पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ताकदीने काम केले जाणार आहे.
प्रारंभी स्वागत प्रशांत यादव यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण यांनी मानले.