“काका, शुभमवर वार झाले आहेत! तुम्ही…” त्याच्या फोनमुळं वडिलांना धक्काच बसला,
कार्वेनाका खूनप्रकरणी एकाला अटक : दोघेजण ताब्यात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शहरातील कार्वे नाका येथे शनिवारी, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास वडोली निळेश्वर तालुका कराड येथील २२ वर्षीय शुभम रवींद्र चव्हाण या युवकाच्या खून प्रकरणी कार्वेनाका येथील एकाला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मुबीन पैगंबर इनामदार ( रा. कार्वेनाका, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत मयत शुभमचे वडील रवींद्र दत्तात्रय चव्हाण वय ५१ रा. वडोली निळेश्वर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रवींद्र चव्हाण हे १९९८ पासून वडोली निळेश्वर येथे सलून दुकान चालवितात. तर त्यांची मुले शुभम व हिम्मत हे दोघेजण कराड शहरातील वडार नाका परिसरात युनिक हेअर सलून नावाचे दुकान चालवितात. शुभम चे शिक्षण बीएससी पर्यंत झाले होते. कॉलेज संपल्यानंतर तो भावासोबत कराडमधील सलूनचे दुकानच चालवीत होता. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शुभम व हिम्मत हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून कराड मधील दुकानात येण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. दुपारी एक वाजता वडील रवींद्र चव्हाण हे जेवणाचा डबा घेऊन कराडमधील दुकानात आले.
त्यावेळी शुभमचा मित्र रिझवान शेख रा. कोरेगाव तालुका कराड हा दुकानात होता. रिझवान याने ‘चहा प्यायला चल ‘ असे म्हणून शुभमला दीडच्या सुमारास दुकानातून बाहेर नेले. त्यानंतर पावणेतीन च्या सुमारास रवींद्र यांनी मुलगा शुभमला फोन करून जेवण करण्यासाठी दुकानात येण्यास सांगितले. त्यावर पंधरा मिनिटात येतो असे शुभमने फोनवरून वडिलांना सांगितले. मात्र काही वेळ वाट पाहिल्यानंतरही शुभम जेवण्यासाठी आला नाही, त्यामुळे त्याचे वडील रवींद्र यांनी पुन्हा शुभमच्या मोबाईलवर फोन केला. तो फोन रिझवान याने उचलला , त्यावेळी रिझवान याने सांगितले की, “काका शुभमवर वार झाले आहेत. तुम्ही कॉटेज हॉस्पिटलला या” हे ऐकून रवींद्र यांना धक्का बसला. त्यांनी मोटरसायकलवरून कॉटेज हॉस्पिटल गाठले. तेथे शुभमला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याच्या गळ्यावर, मानेवर, पाठीवर, पोटावर, शस्त्राने वार केल्याच्या जखमा झाल्या होत्या.
रिझवान शेख हा शुभम यास त्याच्या दुकानातून निहाल पठाण याच्याकडे घेऊन गेला होता. तेथून निहाल पठाण व रिझवान शेख यांनी संगनमत करून शुभमला कार्वे नाका येथे नेले. तेथे पूर्वीच्या भांडणाच्या रागातून मुबीन पैगंबर इनामदार रा. कार्वेनाका याने शुभम याच्याशी वाद घालून सुरुवातीला त्याच्यावर पाठीमागून, तसेच पोटावर, पाठीवर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. शुभम रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर मुबीन याने शुभमच्या गळ्यावर चाकूसारख्या धारदार हत्यार यांनी वार करून त्याचा खून केला, अशी माहिती शुभमचे वडील रवींद्र यांना समजली.
मुख्य संशयितास मलकापुरातून अटक…
दरम्यान, या खूनप्रकरणी मुबीन इनामदार याला शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा मलकापूर शहराच्या हद्दीतून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर अन्य दोन युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.