
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेत नमुना ८ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून हजारमाची ता. कराड येथील एकाच्या वीज देयकामध्ये खाडाखोड करून एकाच नावाने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या ‘सतीश सर’ नावाच्या व्यक्ती विरोधात निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत निवडणूक शाखेकडून मिळालेली माहिती अशी, मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रमांतर्गत निरंतर प्रक्रीयेमध्ये २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघा मध्ये दि.०५/०९/२०२४ ते दि. १३/०९/२०२४ या कालावधीत वापरकर्ता Satish Sir या एकाच नावाने मोबाईल क्रं ७८८७४८२११५ वरून, मौजे हजारमाची येथील एकाच व्यकतीचे वीज देयक खाडाखोड करुन स्थलांतरीतांसाठी नमुना नं. ८ चे ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केल्याने कराड निवडणूक विभागाकडुन दिनांक – १७/०९/२०२४ रोजी एकावर गुन्हा दाखल करणेत आला.
भारत निवडणूक आयोगाकडुन दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दिनांक ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर प्रसिध्दी नंतर निरंतर मतदार नोंदणी अंतर्गत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व स्थलांतरीत अर्ज दाखल करण्याची सुविधा NVSP पोर्टल व voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडुन मतदारांना करुन देणेत आलेली आहे. परंतु सदर सुविधेचा गैरवापर करत २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये नमुना ८ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवुन मतदारांचे ऑनलाईन अर्ज NVSP या पोर्टलमध्ये भ्रमणध्वनी क्रं. ७८८७४८२११५ वरुन Satish Sir या नावाने एकुण ४६२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्जासोबत रहिवासाबाबत पुरावा म्हणून मारुती महादेव सुर्यवंशी रा.हजारमाची ता. कराड जि. सातारा यांचे विज देयक व त्यावरील ग्राहक क्रमांक १९८४०००७११९० या ग्राहक क्रमांकाच्या शेवटच्या ४ अंकामध्ये पांढ-या शाईचा वापर करुन (व्हाईटनरने) खाडाखोड करुन पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली सदर वीज देयकाची प्रत ऑनलाईन अपलोड केलेली आहे. कागदपत्रांची पडताळणी केली असता सदरबाब निवडणूक कार्यालयाच्या निदर्शनास आली.
सदर बाबीची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ या कायदयातील तरतुदींचा भंग केल्याने वापरकर्ते (User) Satish Sir यांचेवर शासनाच्यावतीने निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला आहे.