दुचाकी फोडून युवकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
हल्लेखोरांच्या अटकेचे पोलिसांसमोर आव्हान
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
इस्लामपूर जवळच्या गोटखिंडी येथे बहिणीच्या घरी जेवण करुन दुचाकीवरून कराड जवळच्या कार्वे गावाकडे परतणाऱ्या दोघांकडील दुचाकीचा स्विफ्ट कार मधून पाठलाग करत आलेल्या हल्लेखोरांनी गोंदी ( ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकी फोडून व दोघांमधील एकास पकडून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याप्रकरणी अनोळखी सहा जणांविरुद्ध कराड ग्रामीण पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री गोंदी (ता. कराड) गावच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. संकेत सुरेश मंडले (वय २५. रा. कार्वे) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कार्वे ता. कराड येथील संकेत मंडले हा त्याचा गावातील मित्र अमन मुबारक मुल्ला याच्याबरोबर गोटखिंडी (जि.सांगली) येथील बहिणीकडे जेवण करण्यासाठी दुचाकीवरुन गेला होता. रात्री जेवण केल्यानंतर परत ते दोघे त्याकडील दुचाकीवरून कार्वे गावाकडे परतत होते. यावेळी शिवनगर पासून शेनोली स्टेशन दरम्यान असलेल्या गोंदी गावाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी अमन हा दुचाकीवरच बसला होता. तर संकेत हा लघुशंकेसाठी खाली उतरला होता. यावेळी या दोघांच्या दुचाकीचा पाठिमागुन पाठलाग करत आलेल्या स्विफ्ट कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये अमन हा गाडीवरुन खाली पडला. त्यानंतर कार मधील सहा जण कारमधून बाहेर आले. त्यांच्या हातात दगड व लोखंडी पाईप होती. ते अमनच्या मागे लागल्यावर तो ऊसाच्या शेतात पळुन गेला. मात्र संकेत मंडले याला त्यांनी पकडले.
त्यांनी संकेतला ‘तू आसीफ मुलानी यास ओळखतोस का ?’ असे म्हणत त्याच्या पाठीवर, पायावर, पोटावर लाथाबुक्या आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. तसेच दगड घालून व लोखंडी पाईपने दुचाकी गाडी फोडून नुकसान केले. त्यानंतर त्यांनी संकेतला जबरदस्तीने स्विफ्ट कार मध्ये बसून तेथून त्याला रेठरे कारखाना रस्त्याला नेले. तेथेही त्यांनी संकेतला शिवीगाळ व मारहाण केली, अशी फिर्याद संकेत मंडले याने पोलिसात दिली आहे. त्यावरुन कराड ग्रामीण पोलिसांनी संबंधित अनोळखी सहाजणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बिद्री करत आहेत.
हल्लेखोरांना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान…
या गुन्ह्यातील हल्लेखोरांनी अमानुषपणे संकेत मंडले याचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली आहे. ‘ तू असिफ मुलानी यास ओळखतोस काय?’ असे म्हणत त्यांनी संकेतला शिवीगाळ , दमदाटी व मारहाण केली आहे. त्यामुळे आसिफ मुलानी याच्यासोबत त्यांचे पूर्ववैमनस्य होते काय? त्याचे कारण नेमके काय होते? हल्लेखोरांनी संकेत मंडले यास मारहाण करण्याचे कारण काय? यासह अन्य प्रश्नांची पोलिसांना उकल करावी लागणार आहे. गुन्हा घडल्यानंतर हल्लेखोर पसार आहेत. त्यांच्या अटकेनंतरच चौकशीतून अनेक गोष्टी समोर येणार आहेत. त्यामुळे हल्लेखोरांच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.
सिनेस्टाईल गुन्हे रोखण्यासाठी कडक उपाययोजना हवी…
कराड तालुक्यात गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी कराड शहर व ग्रामीण पोलिसांनी कडक पावले उचलली होती. त्यातून अनेक गुंडापुंडांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तडीपार केले. काहींना मोक्का लावला. मात्र कराड तालुक्यात गुन्हेगारी पुन्हा मूळ धरू पाहत असल्याचे गोंदी येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. दुचाकीचा स्विफ्ट कारने पाठलाग करत हल्लेखोरांनी सिने स्टाईलने दुचाकी फोडली व एका युवकास पकडून लोखंडी पाईपने मारहाण केली. अशा सिनेस्टाईल गुंडागर्दीच्या घटनांना रोखण्यासाठी आता पोलिसांना ॲक्शन प्लॅन तयार करावा लागणार आहे.