श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्राची आठवण करुन देणारे कराड तालुक्यातील १५० वर्ष जुने मंदिर!
डॉ. अतुल भोसले यांनी विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी दिले 'हे' आश्वासन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील आणे गावाचा परिसर नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून, गावात कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्राची आठवण करुन देणारे १५० वर्ष जुने मंदिर आहे. याठिकाणी पर्यटनाला मोठा वाव असून, आणे गावाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. आणे (ता. कराड) येथे विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक शामराव देसाई होते.
डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेतून आणे येथे रस्ता सुधारणेच्या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, आणे गावाला केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेतून यापूर्वी १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना देशभर लागू करुन, प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या ९ वर्षात मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था बनविले आहे. केंद्राच्या व राज्याच्या विविध योजनांना लाभ आपल्या गावातील लोकांना व्हावा, यासाठी मी कटीबद्ध आहे.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई म्हणाले, गेली अनेक वर्षे आम्ही भोसले कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलो. या कुटुंबामुळे आपल्या गावातील अनेक युवकांना रोजगार मिळाला. भागात अनेक विकासकामे झाली. प्रत्येकवेळी या कुटुंबाने आपल्याला भरभरून दिले आहे. आता त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आली आहे. यासाठीच डॉ. अतुलबाबा भोसले यांना आमदार बनवून विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, सरपंच किसनराव देसाई, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष पाटील, व्हाईस चेअरमन सुरेशराव देसाई, शंकर देसाई, दादासाहेब पाटील, विश्वासराव देसाई, संभाजी देसाई, बाळासाहेब देसाई, दादासाहेब पाटील, अमृत नेमाणे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सूरज शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.