कराडचे सुपुत्र प्रा. चेतन दिवाण यांना आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्कार ; शिक्षण व समाजकार्यातील योगदानाचा सन्मान

पुणे, दि. १२ | चांगभलं वृत्तसेवा
वारुंजी ता. कराड येथील सुपुत्र, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये गेली अकरा वर्षापासून शिक्षण सेवा देऊन श्रीगोंदा येथील सनराईज समाजकार्य महाविद्यालयात नुकतेच प्र. प्राचार्य म्हणून रुजू झालेले प्रा. चेतन दिवाण यांना पुणे येथील नामांकित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच संस्थेचे उपाध्यक्ष ॲड शार्दुलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल डॉ. भूषण गोखले व प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधाकर राव जाधवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रा. चेतन दिवाण हे गेली वीस वर्षांपासून व्यावसायिक समाजकार्य, मानसिक आरोग्य, दिव्यांगत्व, व्यावसायिक समाजकार्य शिक्षण व संशोधन या विविध क्षेत्रांमध्ये नवोपक्रम उदयास आणणारे तसेच प्रत्यक्ष कार्याद्वारे , प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचा अवलंब करीत अनुभव देणारे तसेच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून अनुभव देणारे असे अवलिया प्राध्यापक म्हणून सर्वत्र परिचित असून विद्यार्थ्यांची नाळ समजून साध्या व सरळ भाषेमध्ये प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देणारे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिचित आहेत.
प्रा. चेतन दिवाण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिव्यांग अभ्यास मंडळाचे माजी सदस्य तथा अध्यक्ष व विद्या परिषदेचे माजी अध्यक्ष असून राज्यातील बहुतांशी महाविद्यालये, शिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च शिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर तज्ञ सदस्य व तज्ञ शिक्षण सल्लागार म्हणून देखील काम पाहत आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये घेण्यात येत असलेल्या समाजकार्य विषयाच्या सेट परीक्षेचे चेअरमन म्हणून ते उत्तम कार्य पार पाडत असून महाराष्ट्र राज्यात नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते नवीन शैक्षणिक धोरणाची व्यावसायिक समाजकार्यामध्ये उत्तम प्रकारे अंमलबजावणी करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकारच्यावतीने राज्यामध्ये यशस्वी व्यसनमुक्ती मोहीम राबविणे, कोविड काळामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय साधून विविध हेल्पलाइन सुरू करीत जनतेचे मानसिक आरोग्य संवर्धन करणे तसेच मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती व दिव्यांग क्षेत्रामध्ये पाठीमागील वीस वर्षांपासून दिलेल्या योगदानाची दखल घेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने प्रा चेतन दिवाण यांना शिक्षक दिन व संस्थेचे उपाध्यक्ष ऍड शार्दुल राव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी तसेच सीओईपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांना आदर्श कुलगुरू, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षण सेवक , दत्त कला शिक्षण संस्था दौंड चे संस्थापक अध्यक्ष डॉ रामदास झोड यांना आदर्श संस्थापक, तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य अशा पुरस्कारांनी या समारंभामध्ये सन्मानित करण्यात आले.
प्रा चेतन दिवाण यांना प्रदान करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.