हैद्राबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या-विमुक्तांना आदिवासी समाजात समाविष्ट करा – ‘उपराकार’ माजी आमदार लक्ष्मण माने

पुणे , दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देताना हैद्राबाद गॅझेटमधील नोंदींचा आधार घेतला गेला. त्याच गॅझेटचा आधार घेऊन भटक्या-विमुक्त समाजालाही आदिवासी समाजात समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी भटक्या-विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष व ‘उपराकार’ माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली आहे.
यासंदर्भात १० सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना माने म्हणाले, “आमच्या एकूण ४२ जमाती आहेत. त्यात कैकाडी, रामोशी, वडार, कंजारभाट, लमाण, बंजारा, भामटा या १४ विमुक्त जमाती तसेच वैदू, कोल्हाटी, गोसावी, भोईर, नंदीवाले आदी २८ ते ३७ भटक्या जमातींचा समावेश आहे. हे समाज पारंपरिक बलुतेदार नसतानाही त्यांना अन्यायाने ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले.”
गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या जमातींना आदिवासी म्हणून मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही न्याय मिळत नाही, असेही माने यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “मराठा समाजाला कुणबी आरक्षण देताना हैद्राबाद गॅझेटमधील दाखल्यांचा आधार घेऊन प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला. त्या गॅझेटमध्ये आमच्या जमातींची नोंद आदिवासी म्हणून आहे. मग आम्हालाही त्याच गॅझेटच्या आधारे कायदेशीर आदिवासी प्रमाणपत्र द्यावे आणि आमची ५० वर्षांची मागणी पूर्ण करावी.”