ओबीसींनीच खुल्या प्रवर्गात यावं; विजय वड्डेट्टीवार यांचं स्फोटक विधान

कराड, दि. ५ | चांगभलं वृत्तसेवा
“भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आरक्षणाची अपेक्षा भाजपकडून ठेवू नये. सरकारने काढलेल्या अध्यादेशातून ओबीसी व मराठा समाजात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत आता मी ओबीसी समाजालाच खुल्या प्रवर्गात येण्याची मागणी करणार आहे,” असे स्फोटक विधान माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वड्डेट्टीवार यांनी केले.
कराड विमानतळावर नागपूरकडे रवाना होताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे भानुदास माळी, रणजीत देशमुख, अशोकराव पाटील, झाकीर पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वड्डेट्टीवार म्हणाले की, “कुणबी समाजाला दाखले देण्यासाठी आमचा विरोध नाही. पण नव्या गॅझेटच्या आधारे पूर्ण मराठा समाज कुणबी ठरणार असेल, तर ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मोठा गोंधळ होणार आहे. या आरक्षणातून आधीच इतर जातींना १३ टक्के हिस्सा मिळाला असून उरलेल्या जागा मराठा व ओबीसी समाजात विभागल्या गेल्या तर कोणाच्या वाट्याला किती येईल?” असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने जाणूनबुजून दोन समाजांना भिडविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. आता अध्यादेश काढून त्यांची फसवणूक केली जात आहे. दुसरीकडे ओबीसी समाजासाठी स्थापन केलेल्या समितीमधून काहीच निष्पन्न होणार नाही. ही सरकारची बनवाबनवी आहे,” अशी टीका त्यांनी केली.
सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करताना वड्डेट्टीवार म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफी प्रलंबित आहे, अतीवृष्टीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. लाखो कोटींची कंत्राटी बिले थकवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कंत्राटदार आत्महत्या करत आहेत. हे सरकार मतांची चोरी करून सत्तेत आले असून लोकहिताशी त्यांचा काही संबंध नाही.”
सरकारवर भ्रष्टाचार व अधिकाऱ्यांना धमकावल्याचे गंभीर आरोप करत त्यांनी इशारा दिला की, “कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल.”