‘सियाचीनची विजयगाथा’ कराडमध्ये; लेफ्ट. जनरल संजय कुलकर्णींच्या अनुभव कथनाने नागरिक भारावले

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
जनकल्याण प्रतिष्ठान व श्री रेफ्रिजरेशन्स कराड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सियाचीनची विजयगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय सैन्यदलातील निवृत्त लेफ्टनंट जनरल, माजी महासंचालक व ‘सियाचीनचे नायक’ म्हणून ओळखले जाणारे श्री. संजय कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने झाली. लेफ्ट. जनरल कुलकर्णी यांचा श्री. शिरीष गोडबोले व श्री. रवळनाथ शेंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आयोजनात सहकार्य केल्याबद्दल श्री. शेंडे यांचाही गौरव करण्यात आला. सौ. रुपाली तोडकर यांनी अतिथी परिचय करून दिला.
सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी १३ एप्रिल १९८४ रोजी झालेल्या मोहिमेतील पहिला भारतीय सैनिक म्हणून संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या अनुभव कथनाने उपस्थित सर्व नागरिक व विद्यार्थी भारावून गेले. प्रतिकूल हवामान, शून्याखालील तापमान, सतत बदलणारे वातावरण, सहकाऱ्यांचे बलिदान अशा परिस्थितीत धैर्य, संयम व नियोजनाच्या जोरावर भारतीय सैन्याने हा विजय मिळवला, याची ऐतिहासिक गाथा त्यांनी उलगडली.
श्री. रवळनाथ शेंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “भारतीय सैनिकांच्या शौर्यकथनामुळे युवकांमध्ये प्रेरणा जागृत होईल.” तर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिरीष गोडबोले यांनी अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश इनामदार यांनी केले तर आभार सोनाली जोशी यांनी मानले. शेवटी विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’चा गजर करून कार्यक्रमाची सांगता झाली.