कराडमध्ये वारली कलेवर आधारित गणेश सजावट ; भारावून टाकणारी कला चर्चेचा विषय!

कराड प्रतिनिधी, दि. ३० | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहरातील गणेशोत्सवात यावर्षी एक आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली आहे. ऐश्वर्या भरत पाटणकर यांनी आपल्या कुटुंबासह वारली आदिवासी संस्कृतीवर आधारित गणेश सजावट साकारली आहे. महाराष्ट्रातील “चांद्यापासून बांद्यापर्यंत” पसरलेल्या विविध संस्कृतींपैकी वारली कला बहुतेक वेळा फक्त शोभेसाठी वापरली जाते, मात्र तिचा खरा इतिहास आणि गाभा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पाटणकर कुटुंबीयांनी या गणेशोत्सवात केले आहे.
वारली चित्रकला म्हणजे एखाद्या ग्रंथाचे पानच जणू — ती नुसती पाहायची नाही, तर वाचायची असते. प्रत्येक आकारामागे कलाकाराच्या भावना दडलेल्या असतात. या चित्रांसाठी लागणारे रंगही निसर्गातूनच घेतले जातात. निळा रंग महाकुंच फुलांमधून, पिवळा रानफणसापासून, काळा कोळशापासून तर पांढरा रंग तांदुळाच्या पिठीमधून तयार केला जातो.
वारली चित्रांचा उपयोग धार्मिक विधींमध्ये, विशेषतः विवाह सोहळ्यांत केला जातो. या कलेचे जनक म्हणून ओळखले जाणारे जीवा सोमा मसे यांनी वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह सन 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
या पारंपरिक कलेचा गौरव करण्यासाठी पाटणकर कुटुंबाने गणेश सजावटीत संपूर्ण वारली थीम वापरली आहे. या सजावटीत कुठलाही पर्यावरणाला अपायकारक साहित्य वापरण्यात आलेले नाही. सर्व चित्रे स्वतः काढून त्यांच्या माध्यमातून वारली जमातीतील जीवनप्रसंग आणि भावना प्रकट केल्या आहेत.
https://youtube.com/shorts/x8GFRG8343w?si=H4tTQjcX2HiU3lUr
वारली कलेला अशा प्रकारे नव्या पिढीकडून मिळालेला सन्मान पाहून कराडकर भारावून गेले आहेत. वारली परंपरेला मानाचा मुजरा करत गणेशभक्तांना आकर्षित करणारी ही सजावट सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.