पाचवड पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी; ॲड. उदयसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश, अजितदादा पवार यांच्याकडून ४ कोटींचा निधी मंजूर

कराड प्रतिनिधी, दि. ३० | चांगभलं वृत्तसेवा
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जाणारा पाचवड येथील कृष्णा नदीवरील मोठा पूल प्रत्यक्षात साकार होत आहे. या पुलासाठी आवश्यक असलेला भूसंपादनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून राष्ट्रवादीचे नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्तक्षेपामुळे यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या पुलाची संकल्पना माजी मंत्री व लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांनी मांडली होती. कराड दक्षिणचा पश्चिम डोंगराळ भाग व पूर्वेकडील कृष्णा काठ यांना जोडणारा हा पूल जनतेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचा ठरणार आहे. सध्या या पुलाचे ४ पिलरचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर मौजे कोडोली (ता. कराड) कडील ८४० मीटर लांबीचा नवा जोडरस्ता तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणारा ६५० मीटरचा रस्ता १२ मीटर रुंदीने करण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.
या प्रस्तावांतर्गत मौजे नांदलापूर, नारायणवाडी, पाचवड (वस्ती-कापील) आणि कोडोली या गावांतील एकूण २७ गटहद्दीतून जोडरस्ते जाणार आहेत. भूसंपादनासाठी आवश्यक किंमत ४ कोटी रुपये इतकी असून शासनाकडे या रकमेची मागणी करण्यात आली होती. आता निधी प्राप्त झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मोबदला देऊन पुढील कामाला गती मिळणार आहे.
याबाबत ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांगितले की, “शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन उर्वरित काम तत्काळ सुरू करून पुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार.”