सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संरक्षणासाठी श्वानपथक सज्ज; राष्ट्रीय विजेती ‘बेल्जी’ दाखल

कोल्हापूर | चांगभलं वृत्तसेवा
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या वन्यजीव संरक्षण मोहिमेत आजपासून नवा जोश आला आहे. ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे प्रशिक्षित श्वान – बेल्जी आणि त्याची ‘डॉग हँडलर’ कु. सारिका जाधव (वनरक्षक, फिरते पथक) तसेच सहायक डॉग हँडलर श्री. अनिल कुंभार (वनरक्षक, पाटण) हे १५ ऑगस्ट २०२५ पासून अधिकृत सेवेत रुजू झाले आहेत.
हा उपक्रम ट्रॅफिक इंडिया (TRAFFIC India – WWF) च्या माध्यमातून राबविण्यात आला असून, यासाठी ‘बेल्जी’ ने हरियाणातील पंचकुला येथील राष्ट्रीय कुत्रा प्रशिक्षण केंद्रात (NTCD) तब्बल 28 आठवड्यांचे कठोर स्निफर डॉग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. देशभरातील 8 राज्यांतील 14 श्वानांपैकी कु. सारिका जाधव आणि ‘बेल्जी’ या जोडीने प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे प्रशिक्षित श्वान अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास, वृक्षतोडीवर नियंत्रण आणि शोधमोहीम अशा कामांत महत्त्वपूर्ण योगदान देईल. त्यामुळे आमच्या विभागाची कार्यक्षमता व गती निश्चितच वाढेल.”
बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान त्यांच्या बुद्धिमत्ता, चपळता आणि तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे बेकायदेशीर वन्यजीव तस्करी, शिकारीला शोधणे, ड्रग्ज व स्फोटके ओळखणे अशा अनेक संवेदनशील कामांसाठी उपयुक्त ठरतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘बेल्जी’च्या समावेशामुळे वन्यजीव संरक्षणाची ताकद अधिक बळकट झाली आहे.