शिवराज मोरे यांचे कराडात जल्लोषात स्वागत; कार्यकर्त्यांत उत्साहाचा माहोल

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या शिवराज मोरे यांचे रविवारी कराडसह जिल्हाभर जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिरवळपासून कराडपर्यंतच्या प्रवासादरम्यान टप्प्याटप्प्यावर कार्यकर्त्यांनी हार घालून, गुलालाची उधळण करून आणि घोषणाबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले.
“शिवराज दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” आणि “एकच वादा, शिवराज दादा” अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. तासवडे टोल नाक्यावर कराड उत्तर काँग्रेस कमिटीकडून मोरेंचे विशेष स्वागत झाले.
कराड शहरात आगमन होताच शिवराज मोरे यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यास, दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले स्मारकास अभिवादन केले. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
अलीकडच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असताना, शिवराज मोरे यांच्या निवडीने व कराडमधील आगमनाने कार्यकर्त्यामध्ये नवा उत्साह संचारला. मोठ्या वाहन मिरवणुका, क्रेनवर लटकणारे प्रचंड हार, चौकाचौकातील जल्लोष आणि घोषणाबाजी यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण काँग्रेसमय झाले होते.