गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विलेपार्ले धनगर समाजसेवा संघाचा हातभार ; कराडच्या अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टकडे १११ शैक्षणिक बॅगा सुपूर्द

कराड, दि. ९ | चांगभलं वृत्तसेवा
गोरगरीब आणि डोंगर दऱ्या-खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विलेपार्ले, मुंबई येथील धनगर समाजसेवा संघाने एक उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. संस्थेच्यावतीने यंदा कराड येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टला तब्बल १११ शैक्षणिक बॅगा सुपूर्द करण्यात आल्या.
धनगर समाजसेवा संघाने रायगड जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांमधील विद्यार्थ्यांना गेली १५ वर्षे शैक्षणिक साहित्याचे वाटप करत परंपरा जपली आहे. तर कराडस्थित अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने गेली २५ वर्षे जंगल, डोंगर दऱ्या-खोऱ्यातील दुर्लक्षित मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
यंदा विलेपार्ले येथील धनगर समाजसेवा संघाचे अध्यक्ष बाळाराम खुटेकर, तानाजी कचरे (उपाध्यक्ष), सुनिल ढेबे (खजिनदार), ज्ञानेश्वर ठिकडे (प्रमुख सल्लागार) यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्याकडे या शैक्षणिक बॅगा सुपूर्द केल्या.
“बहुजन समाज अजूनही अज्ञानाच्या अंधारात आहे. त्यांना प्रकाशाकडे नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. त्यामुळेच या बॅगांचे वाटप केवळ वस्तूंचे दान नसून उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे,” असे ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने विलेपार्ले धनगर समाजसेवा संघाचे मनःपूर्वक आभार मानले.