गणेशोत्सवात डॉल्बीला ‘हिरवा कंदील’, पण ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन अनिवार्य, तर लेझरवर बंदी कायम!

सातारा, ८ ऑगस्ट २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. गणेशोत्सव २०२५ दरम्यान डॉल्बी वाजवण्यास बंदी नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषण मर्यादेचे पालन अनिवार्य राहणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सर्व तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट सांगितले की, “डॉल्बी वाजवायला बंदी नाही, पण ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे“. त्यामुळे डॉल्बीचा आनंद घेणाऱ्या गणेशभक्तांनी न्यायालयाने निश्चित केलेल्या मर्यादेतच उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
लेझर लाईटवर मात्र संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
पालकमंत्री देसाई यांनी सांगितले की, “लेझर लाईटमुळे डोळ्यांना धोका संभवतो. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक गणेश मंडळ लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई होईल.”
याशिवाय, गौरी विसर्जनानंतर महिलांवर होणाऱ्या छेडछाडीसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीत कुठलाही तंटा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज राहणार आहे.
“गणेशोत्सव सर्वांनी आनंदात, उत्साहात आणि सुरक्षिततेने साजरा करावा. यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी केली आहे,” असे आवाहनही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठकीच्या शेवटी केले.